अहमदनगर कलेक्टर ऑफिससमोर व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं!

  • Sachin Patil
  • Published On - 20:08 PM, 20 Dec 2018
अहमदनगर कलेक्टर ऑफिससमोर व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं!

अहमदनगर : अनधिकृत बांधकामं हटवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने एका इसमाने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जतच्या तौसिक शेख यांनी अंगार रॅकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला.

या घटनेत तौसिक शेख 70 टक्के भाजले आहेत. तसेच सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील मुस्लीम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ काढा, अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तौसिक हमीम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतलं.

यावेळी कोणीतरी स्वत:ला पेटवून घेत असल्याचं दिसताच पत्रकार उमेश दारुणकर हे तौसिक शेख यांच्याकडे धावले. मात्र, आग मोठ्या प्रमाणात होती आणि विझवण्यासाठी जवळ काहीच नव्हते. तरीही उमेश दारुणकर यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांनी सदरचं बांधकाम पाडून टाकण्याबाबत 11 जुलै 2018 रोजी आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. त्यावेळीही पोलीस बंदोबस्तात बांधकाम काढण्याचं आश्वासन देण्यात आलं. तरीही कार्यवाही न झाल्याने अखेर शेख यांनी आत्महदहनाचा प्रयत्न केला.

दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन शेख यांनी अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतून क्षणात काडीपेटी लावली. जवळपास 70 टक्के त्यात ते भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आलं. पोलीस बंदोबस्त असतानाही सय्यद यांनी पेटवून घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच खळबळ उडाली.