कार्यकर्त्यांची हाक; अजितदादांची साद! गाडी थांबवून अजितदादांनी घेतली नवीन व्यवसायाची माहिती

विशेष म्हणजे यंदा आगळावेगळा प्रसंग बारामतीकरांनी अनुभवलाय.

  • नवीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती
  • Published On - 17:25 PM, 17 Jan 2021
कार्यकर्त्यांची हाक; अजितदादांची साद! गाडी थांबवून अजितदादांनी घेतली नवीन व्यवसायाची माहिती

बारामतीः गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ पवार कुटुंबावर बारामतीकरांनी जीवापाड प्रेम केलंय. पवार कुटुंबांना बारामतीकरांनी दिलेलं प्रेम अनेकदा पाहायला मिळालंय. बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा जात असतानाही त्यांच्यामागे कार्यकर्त्यांचा मोठा गराडा असतो. विशेष म्हणजे यंदा आगळावेगळा प्रसंग बारामतीकरांनी अनुभवलाय. (After Stopping The Car, Ajit Pawar Got Information About The New Business)

त्याचं झालं असं की, विकासकामांची  पाहणी करून परतताना एका कार्यकर्त्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला रस्त्यावर उभं राहून हात केला. स्वत: सारथ्य करत असलेल्या अजितदादांनी गाडी थांबवली. आपल्या नव्यानं सुरू होत असलेल्या हॉटेलला भेट देण्याची विनंती या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर त्याला उद्घाटनाला वेळ देण्याचं कबूल करत अजितदादांनी त्याच्या व्यवसायाची इत्थंभूत माहिती घेत त्याला सूचनाही केल्या.

नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. आपल्या व्यवसायाला आपल्या नेत्यानं भेट द्यावी, असं प्रत्येकाला वाटतं. बारामतीतील मोरगाव रस्त्यावर अक्षय माने हा युवक हॉटेल व्यवसाय सुरू करतोय. याच परिसरात अजितदादा विकासकामांची पाहणी करीत असल्यानं त्यांनी आपल्या हॉटेलचीही पाहणी करावी, या उद्देशानं तो अजित पवार यांचा ताफा येण्याची वाट पाहत आपल्या सहकारी मित्रांसमवेत रस्त्यावरच थांबला. अजित पवार यांचा ताफा येत असल्याचं दिसताच त्यानं हात उंचावून हा ताफा थांबवण्याची विनंती केली.

अन् अजितदादांनी गाडी थांबवत या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं
स्वत: गाडीचं सारथ्य करीत असलेल्या अजितदादांनी गाडी थांबवत या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानं आपण हॉटेल व्यवसाय सुरू करत असल्याचं सांगत भेट देण्याची विनंती केली. त्यावर अजित पवार यांनी हॉटेल इमारतीपासून आचाऱ्यापर्यंत सर्व इत्थंभूत माहिती विचारून घेत त्याला उद्घाटन कार्यक्रमाला येण्याचा शब्द दिला. हा सर्व प्रसंग पाहणाऱ्या नागरिकांना अजितदादांची कार्यकर्त्यांशी असलेली नाळ किती मजबूत आहे आणि बारामतीकर वर्षानुवर्षे पवार कुटुंबीयांवर प्रेम का करतात, याची प्रचिती देऊन गेला.

अजित पवार शिस्तप्रिय आणि खडे बोल सुनावणारे नेते म्हणून परिचित 
एरव्ही अजित पवार हे शिस्तप्रिय आणि खडे बोल सुनावणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र कार्यकर्त्यांच्या सुखदु:खात धावून जाण्याची त्यांची हातोटीही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आजही अचानकपणे कार्यकर्त्यानं हात करून थांबवल्यानंतर त्याला नेमकं काय हवं हे जाणून घेत अजितदादांनी आपलं वेगळेपण दाखवून दिलं.

संबंधित बातम्या

अजित पवार साहेब, भाषा नीट करा, नाहीतर तुमची घमेंड उतरवेन, निलेश राणेंचा हल्लाबोल

सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली : अजितदादा

After Stopping The Car, Ajit Pawar Got Information About The New Business