पुन्हा काकांची साथ धरणार का, शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार का? अजित पवार यांचं दोन शब्दांत उत्तर
विधानसभेच्या निवडणुकीआधी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शरद पवार गटाकडून वेगवेगळे दावे केल जात आहेत. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जातोय. दुसरीकडे अजित पवार यांना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दोन शब्दांत उत्तर दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या दोन गटात विभागलेला बघायला मिळतोय. दोन्ही गटांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. दोन्ही पक्षांच्या राज्यभरात सभा पार पडत आहेत. पण तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न नेहमी चर्चेत येत असतो. विशेष म्हणजे बारामतीत आपल्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभं करणं ही आपली चूक होती, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात अजित पवार शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जातील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.
अजित पवार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी दोन शब्दांत उत्तर देत फार बोलणं टाळलं. अजित पवार यांनी ‘नो कमेंट्स’ असं उत्तर दिलं. याचाच अर्थ अजित पवार यांना सध्याच्या घडीला भाष्य करायचं नाही. अजित पवार एकीकडे महायुतीसोबत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी आखत आहेत. दुसरीकडे आपण शरद पवार यांच्यासोबत पुन्हा राजकीय वाटचाल करणार नाही, असंदेखील स्पष्ट बोलताना दिसत नाहीयत. त्यामुळे अजित पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.
शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“नो कॉमेंट्स. मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काम केलं. कोणत्या मतदारसंघात काय केलं याची माहिती लोकांना देत आहोत. लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून जे काही बाकी राहिलं. त्यामुळे मतदार आमच्यासोबत आला नाही. त्यांना समजावत आहोत”, असं उत्तर अजित पवारांनी दिलं.
‘कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचा होता’
यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना बारामतीत निवडणूक लढवण्यास लावणं ही चूक होती, या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी ३५ वर्षापासून राजकारणात आहे. मला कुणी तरी विचारलं. मी निवडणुकीनंतर बराच विचार केला. हे कसं झालं. का झालं. त्याला मीच जबाबदार आहे. मी कुणाला दोष देत नाही. मला असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे मी बोललो”, असं अजित पवार म्हणाले.
“कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचा होता. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोललो. पत्नीला उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाने ठरवलं. आमच्याकडे चारच जागा होत्या. त्यानंतर परभणीची जागा आम्हाला सोडावी लागली. धाराशीवची जागा घेतली. पण महायुतीचे आमदार होते. राष्ट्रवादीचे नव्हते”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.