‘ती माझी चुकच, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या राजकीय संघर्षामुळे कुटुंबियांना त्रास झाला’, अजित पवार यांचा मोठा खुलासा
"कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचा होता. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा-कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोललो", असा खुलासा अजित पवारांनी केला.
लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड रणधुमाळी बघायला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य लोकसभा निवडणुकीत समोरासमोर आले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा बारामतीत पराभव करण्यासाठी अनेकांनी ताकद लावल्याचा इतिहास आहे. पण या लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातीलच दोन सदस्य समोरासमोर उभे होते. यामुळे या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं. या निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या उमेदवार होत्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दुसऱ्या उमेदवार होत्या. दोन्ही बाजूने या निवडणुकीत ताकद लावण्यात आली होती. अजित पवारांनी प्रचंड ताकद लावली होती. पण तरीही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या पराभवावर अजित पवार यांनी नुकतंच मोठं वक्तव्य केलं होतं. सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणूक लढवायला सांगणं ही आपली चूक होती, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आपल्या या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण आता दिला आहे. अजित पवार यांनी आज एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतत याबाबत सविस्तर भूमिता मांडली.
“माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी ३५ वर्षापासून राजकारणात आहे. मला कुणी तरी विचारलं. मी निवडणुकीनंतर बराच विचार केला. हे कसं झालं. का झालं. त्याला मीच जबाबदार आहे. मी कुणाला दोष देत नाही. मला असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे मी बोललो. कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचा होता. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा-कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोललो”, असा खुलासा अजित पवारांनी केला.
‘पत्नीला उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा’
“पत्नीला उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाने ठरवलं. आमच्याकडे चारच जागा होत्या. त्यानंतर परभणीची जागा आम्हाला सोडावी लागली. धाराशीवची जागा घेतली. पण महायुतीचे आमदार होते. राष्ट्रवादीचे नव्हते”, असं अजित पवार म्हणाले.
“माझा स्वभाव पक्षातील सर्वांना माहीत आहे. कुटुंबाबत मला बोलण्याचा अधिकार आहे. कुटुंब म्हणूनच मी ते विधान केलं आहे. त्यामुळे कुणी नाराज होऊ नये. माझी विनंती आहे की माझं विधान चुकीचं वाटलं असेल तर त्यावर अधिक विचार करू नये. तो आमच्या कुटुंबातील मामला आहे. मला जे सांगायचं ते सांगितलं. मी मनापासून मी बोललो”, असं अजित पवार म्हणाले. “महायुतीच्या कुणी याविषयावर बोललं नाही. मला कोणी काही बोलत नाही. मला जे मनाला वाटतं ते मी करतो. इतर विषयात राजकीय विषयात आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो”, असं अजित पवार म्हणाले.