अंबाजोगाईतील डॉक्टरांच्या उपक्रमाला मोहिमेचं रुप, नदीपात्रातून 12 टन कचरा काढला

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्येही अवघ्या सहा जणांनी सुरुवात केलेल्या प्लास्टिकमुक्त जयवंती-वाण नदी मोहिमेने दहा दिवसात जनआंदोलनाचं रुप घेतलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहराच्या गजबजलेल्या भागातून प्लास्टिकमुक्त अंबाजोगाईचा नारा देत भव्य रॅली काढण्यात आली.

अंबाजोगाईतील डॉक्टरांच्या उपक्रमाला मोहिमेचं रुप, नदीपात्रातून 12 टन कचरा काढला

बीड : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्येही अवघ्या सहा जणांनी सुरुवात केलेल्या प्लास्टिकमुक्त जयवंती-वाण नदी मोहिमेने दहा दिवसात जनआंदोलनाचं रुप घेतलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहराच्या गजबजलेल्या भागातून प्लास्टिकमुक्त अंबाजोगाईचा नारा देत भव्य रॅली काढण्यात आली.

दहा दिवसांपूर्वी अंबाजोगाईतील डॉ. नितीन चाटे यांच्यासह यस ग्रुपचे पक्षीमित्र  रत्नाकर निकम, वृक्षमित्र राजेसाहेब कीर्दंत, डॉ. अविनाश मुंडे, केशव कुसरे, राजीव पटेल यांनी प्लास्टिक कचरा वेचण्याचं अभियान सुरु केलं. अनेक दशकांपासून प्लास्टिकच्या विळख्यात सापडलेल्या वाण-जयवंती नदीच्या बुट्टेनाथ येथील पात्रात हे अभियान सुरु केलं.

कोणतीही मोहिम जनसहभागाने लवकरात लवकर यशस्वी होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टरांनी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. गेले 11 दिवस दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत ही मोहिम राबवली गेली. आतापर्यंत बारा टन कचरा अवघ्या अडीचशे मीटर पात्रातून काढुन बुट्टेनाथ दरी प्लास्टिक मुक्त करण्यात आली आहे.

ऊत्स्फूर्त लोकसहभागाला साथ देत नगरपालिका प्रशासनाने प्रतिसाद देत कचरा वाहून नेण्याची व्यवस्था केली. डॉक्टर्स संघटना, विविध मॉर्निंग क्लब, पर्यावरणवादी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभाग घेऊन प्लास्टिकच्या अतिवापर आणि त्यातून होणाऱ्या हानीबद्दल सोशल मीडियात फोटोंसह पोस्ट टाकून या मोहिमेला बळ दिलं.

पर्यावरण दिनाच्या सायंकाळी प्लास्टिकच्या अतिवापराबद्दल व्यापारी आणि जनतेला जागरुक करण्यासाठी ‘प्लास्टिकमुक्त अंबाजोगाई’ अभियान अंतर्गत मोठी रॅली काढून घोषणा आणि माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही प्लास्टीक कॅरीबॅगचा सर्रास वापर होत आहे. या प्लास्टिकमुळे पशु पक्षी, वनराई, जलसाठे, नदीपात्र आणि मनुष्यप्राण्यास होऊ शकणाऱ्या कॅन्सर नपुंसकत्व या आजारांबद्दल जनजागृती करण्यात आली.

शहरातून काढलेल्या रॅलीसाठी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, मानवलोक, समाज विज्ञान स्टाफ,  डॉक्टर्स, विद्यार्थी, शिक्षक, युवा संघर्ष ग्रुप, युथ मिनिस्ट्री, ऑटो युनियन यांसह दोनशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. शिवाय जनता आणि व्यापाऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *