आंगणेवाडी यात्रा मार्ग सील; आंगणे कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा मंदिरात आरोग्य तपासणीनंतर प्रवेश

आंगणे कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 23:48 PM, 2 Mar 2021
आंगणेवाडी यात्रा मार्ग सील; आंगणे कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा मंदिरात आरोग्य तपासणीनंतर प्रवेश

सिंधुदुर्गः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण येथील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबातील 50-50 व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. (Anganwadi Yatra Route Seal; Admission To The Courtyard Family Members)

भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग सील

अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. इतर ठिकाणांवरून येणाऱ्या भाविकांसाठी आंगणेवाडीत येणारे मालवण, कणकवली, मसुरे हे मार्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने सील केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात दुकान लावण्यास मनाई करण्यात आलीय. तशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्यात.

जिल्हा प्रशासन आणि आंगणे ग्रामस्थ मंडळ यांची महत्त्वपूर्ण बैठक

राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आंगणे ग्रामस्थ मंडळ यांची महत्त्वपूर्ण बैठक आंगणेवाडी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

आंगणेवाडीत येणारे रस्ते भाविकांसाठी बंद करण्याच्या सूचना

बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करत आंगणेवाडीत येणारे रस्ते भाविकांसाठी बंद करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच आंगणेवाडी यात्रा फक्त आंगणे कुटुंबीय मर्यादित आहे. अन्य कोणालाही यात्रेत प्रवेश नाही. राजकीय नेतेमंडळी अथवा पत्रकार यांनाही यात्रेदरम्यान मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

भराडी देवीची यात्रा आंगणेवाडी ग्रामस्थ मर्यादित स्वरूपात

राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने भराडी देवीची यात्रा आंगणेवाडी ग्रामस्थ मर्यादित स्वरूपात होत असून, भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

आंगणेवाडीची यात्रा नेमकी आहे तरी काय?

आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मसुरे हे सर्वात मोठे गाव आहे. आंगणेवाडीची यात्रा सिंधुदुर्गासह देशभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेला राज्यासह देशभरातील नागरिक येतात. ही यात्रा दोन दिवसांची असते. विशेष म्हणजे कोणतीही तिथी बघून यात्रेची तारीख ठरवली जात नाही तर देवीचा कौल घेऊन तारीख ठरवली जाते. या यात्रेला लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाला येते. भराडी देवी नवसाला पावते, अशी ख्याती आहे.

संबंधित बातम्या

कोकणातली सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा रद्द, काय आहे ही यात्रा?

Anganwadi Yatra Route Seal; Admission To The Courtyard Family Members