ट्रकच्या धडकेत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावरील पोलीसकर्मी मृत्युमुखी, अनिल देशमुख म्हणाले घरचा माणूस गेला!

संजय धनराज नारनवरे यांच्या बाईकला ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांना प्राण गमवावे लागले. (Anil Deshmukh Police Security Accident)

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 8:16 AM, 18 Feb 2021
ट्रकच्या धडकेत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावरील पोलीसकर्मी मृत्युमुखी, अनिल देशमुख म्हणाले घरचा माणूस गेला!
गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुरक्षारक्षक संजय नारनवरे

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून तैनात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. संजय धनराज नारनवरे यांच्या बाईकला ट्रकने धडक दिल्यानंतर त्यांना प्राण गमवावे लागले. (Anil Deshmukh Nagpur Bungalow Police Security Dies in Accident Home Minister express grief)

नागपूरमधील सिव्हिल लाईन्स भागात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बंगला आहे. पोलीस अंमलदार संजय नारनवरे या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. बुधवारी रात्री मोटरसायकलने कर्तव्यावर हजर राहण्यासाठी ते घरुन निघाले. मात्र नांदगाव फाटा परिसरात एमएच-40-बीएल-7968 या क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली.

पसार ट्रकचालकाच्या शोधासाठी नाकाबंदी

अपघातात संजय नारनवरे यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोराडी मार्गावरील नांदगाव फाटा येथे घडली. घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. आरोपी ट्रकचालकाला अटक करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी लावली आहे.

गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्त

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दुःख व्यक्त केलं आहे. “आम्ही संजय धनराज नारनवरे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे.” अशा भावना गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अनिल देशमुख यांनी तब्बल आठ दिवसानंतर पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

गृहमंत्री देशमुख कोरोनाग्रस्त तरीही कार्यक्रमाला हजर, राष्ट्रवादीचा पक्षविस्तार अजेंडा फॉर्मात

(Anil Deshmukh Nagpur Bungalow Police Security Dies in Accident Home Minister express grief)