Eknath shinde: वयाच्या 81 व्या वर्षी शरद पवारांची बंड मोडण्यासाठी एवढी निकराची लढाई का? वाचा 5 कारणे

वयाच्या 81 वर्षीही राज्यातील सरकार वाचवण्यासाठी पवार निकराने उभे राहिले आहेत, इतकेच नाही तर त्यांनी ही सगळी सूत्रेच स्वताच्या हातात घेतल्याचे सांगण्यात येते आहे. शरद पवार यांना यातून काय साधायचे आहे, ते हे करतायेत, त्याची ही काही पाच कारणे

Eknath shinde: वयाच्या 81 व्या वर्षी शरद पवारांची बंड मोडण्यासाठी एवढी निकराची लढाई का? वाचा 5 कारणे
Sharad pawar action reasons
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jun 26, 2022 | 3:24 PM

मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर सध्या दोन नावे चांगलीच चर्चेत आहेत. ती म्हणजे शरद पवार (Sharad Pawar)आणि संजय राऊत (Sanjay Raut). आता मविआचे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार पुढे सरसावले आहे असे सांगण्यात येते आहे. सोमवारी जेव्हा शिवसेना बंडखोर हे मोठ्या संख्येने महाराष्ट्राबाहेर आहेत, असे समोर आले होते, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे थोडे निराश झाले होते. ते आमदार परततील, शरद पवार जेव्हा दिल्लीतून परतले आणि त्यांनी जेव्हा राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, दोन्ही नेत्यांमध्ये आत्मविश्वास आल्याचे पाहायला मिळाले आहे. शरद पवारांनी यापूर्वीही अशा बंडांचा सामना केलेला आहे, त्यांना अनुभव दांडगा आहे. प्रशासकीय आणि कायदेशीर खाचाखोचा यांची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळेच त्यांनी सतत पत्रकार परिषदांतून या आमदारांना भविष्य नसल्याचे सांगत, त्यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपा या ष़डयंत्रमागे आहे, हे ते ठासून सांगतायेत. वयाच्या 81 वर्षीही राज्यातील सरकार वाचवण्यासाठी पवार निकराने उभे राहिले आहेत, इतकेच नाही तर त्यांनी ही सगळी सूत्रेच स्वताच्या हातात घेतल्याचे सांगण्यात येते आहे. शरद पवार यांना यातून काय साधायचे आहे, ते हे करतायेत, त्याची ही काही पाच कारणे

1. मविआ सरकार वाचवणे

राज्यात भाजपाच्या अश्वमेधाला रोखण्याचे काम २०१९ च्या निवडणुकीनंतर, राज्यात मविआच्या प्रयोगाने केले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कल्पनेतून या आघाडी सरकारचा जन्म झाला. त्यामुळे या दोघांसाठीही हे सरकार वाचवणे हा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतील निराशा झटकत, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि पक्षात उमेद निर्माण केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्रीही आक्रमक झाले आहेत.

2. राष्ट्रीय नेतृत्व कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता महत्त्वाची

भाजपाने केंद्रात आणि इतर राज्यांतही काँग्रेससह विरोधकांना निष्प्रभ केल्यानंतर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवण्यात आला. भाजपा हा 105 आमदारांसह एक नंबरचा पक्ष असतानाही, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार अस्तितवात आले. यामुळे भाजपाचा वारु रोखता येतो, असा संदेश देशात गेला. स्वाभाविकच या आघाडी सरकारच्या प्रयोगाचे श्रेय शरद पवारांना मिळाले. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांतही त्यांना अधिक महत्त्व मिळाले. आता लोकसभा निवडणुकांसाठीच्या तयारीसाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही पवार हे केंद्रस्थानी आहेत. थोडक्यात राष्ट्रीय राजकारणात त्यांचे महत्त्व आहे. राज्यत सत्ता असल्याने आणि शिवसेना, काँग्रेससारखे पक्ष सोबत असल्याने इतर विरोधकांना एकत्र घेणे हे पवारांना अधिक सोपे जाणारे आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वासाठीही पवारांना राज्यात सत्ता असणे महत्त्वाचे मानण्यात येते आहे.

3. 2024  लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी प्रयोग गमवावा लागेल.

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला सोडून तिसरी आघाडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यात ममता बॅनर्जी, शरद पवार यांचे स्थान महत्त्वाचे आहे. या आघाडीचे नेतृत्व करण्याची संधीही पवारांना आहे. नुकतेच विरोधकांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठीही पवारांच्या नावाची चर्चा झाली होती. अशा स्थितीत जर हे नेतृत्व करायचे असेल तर त्यावेळी राज्यात तेही महाराष्ट्रात सत्ता असणे फायदेशीरच ठरणार आहे. जर राज्यातील सत्ता गेली तर तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वात शरद पवार यांचे नाव मागे पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

4. प्रादेशिक पक्ष संपण्याची भीती

भाजपाचा विस्तार हा राक्षसी स्वरुपाचा आहे. त्यांच्या या लाटेत काही राज्य वगळल्यास प्रादेशिक पक्ष मागे पडलेले दिसतायेत. अशा स्थितीत राज्यात शिंदे आणि भाजपा गट एकत्र आले तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होईल, अशी भीती आहे. त्यासह संपूर्ण देशात प्रादेशिक पक्ष एकत्रित भाजपासमोर तग धू शकत नाही, हा संदेशही जाण्याची शक्यता आहे. हे शरद पवारांना नक्कीच नको आहे. त्याचमुळे कुठल्याही स्थितीत राज्यात मविआ सरकार राहावे, असा त्यांचा अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न असणार आहे.

हे सुद्धा वाचा

5. राष्ट्रवादीही फुटण्याची भीती

शिवसेनेत फूट पडली, तर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडण्याची भीती शरद पवारांना असण्याची शक्यता आहे. शिंदे गटासोबत भाजपा सत्तेत आल्यास राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आगामी निवडणुकांत अनेक जण भाजपाकडे किंवा शिंदेंकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांनी फडणवीसांसोबत केलेल्या शपथविधीचा प्रोयगही सगळ्यांच्याच स्मरणात आहे. त्यामुळे ही पण भीती असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कुठल्याही स्थितीत राज्यातील मविआ सरकार पडू नये यासाठी शरद पवार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें