धुळ्यात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाच्या कार्यालयावर कोयत्याने हल्ला, हल्लेखोरांकडून प्रचंड तोडफोड, दोन जण जखमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोंडाईचा शहराध्यक्ष एकनाथ भावसार यांच्या कार्यालयावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे (Attack on Dhule NCP office).

धुळ्यात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाच्या कार्यालयावर कोयत्याने हल्ला, हल्लेखोरांकडून प्रचंड तोडफोड, दोन जण जखमी

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोंडाईचा शहराध्यक्ष एकनाथ भावसार यांच्या कार्यालयावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याची शक्यता भावसार यांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाला आहे. त्यामुळे या हल्ल्याची गंभीर दखल घेण्याची विनंती भावसार यांनी पोलिसांना केली आहे (Attack on Dhule NCP office).

एकनाथ भावसार यांच्या कार्यालयावर निकोडे नावाच्या व्यक्तीने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. त्याच्यासोबत आणखी एक इसम होता. दोघांनी राष्ट्रवादी कार्यालयात शिरुन प्रचंड तोडफोड केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर फाडले. या घटनेत कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यालयावर शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सकाळी हल्ला झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तातडीने कार्यालयाजवळ गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेवर एकनाथ भावसार यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Attack on Dhule NCP office).

“मी नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजता पक्ष कार्यालयात गेलो. मी राष्ट्रवादीचा दोंडाईचा शहराध्यक्ष या नात्याने रोज 9 ते 12 वाजेपर्यंत कार्यालयात काम करत असतो. त्यानुसार आजदेखील पक्षाच्या कार्यालयात गेलो. मी पाच मिनिटे काही कामानिमित्ताने बाहेर गेलो. त्यानंतर दोन इसम हातात हत्यार घेऊन कार्यालयात शिरले. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला माझा पत्ता विचारला. त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने मुस्ताक शेख या व्यक्तीने तो वार वरच्यावर झेलला”, असं भावसार यांनी सांगितलं.

“त्यानंतर घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील आले. योगेश पाटील यांनी हल्लेखोराला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसावरही कोयता उगारला. योगेश पाटील खाली पडले. त्यांनी खुर्ची आडवी केली, अन्यथा त्यांनादेखील गंभीर जखमी केलं असतं”, असं भावसार म्हणाले.

“हल्लेखोर कुणाच्यातरी सांगण्यावरुन हल्ला करु शकतो. दोंडाईचा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता विरोधकांनी दहशत निर्माण करण्यासाठी पक्ष कार्यालयावर हल्ला केल्याची शंका नाकारता येत नाही. पोलिसांनी या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन हल्ल्याची कारणे शोधून काढावी. ते कारणे जनतेसमोर मांडावी, ही आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भूमिका आहे”, अशी भूमिरा भावसार यांनी मांडली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या धुळे शहरातील घरावरही अज्ञातांनी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. या घटनेत रणजीत भोसले यांच्या चारचाकी वाहनांचे नुकसान झाले होते. एकनाथ भावसार यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही: बाळासाहेब थोरात

काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI