तिरंग्याला वंदन करून अंगावर रॉकेल ओतलं; सातारा, परभणी आणि धुळ्यात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं सर्वच हादरलेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:50 AM, 26 Jan 2021
तिरंग्याला वंदन करून अंगावर रॉकेल ओतलं; सातारा, परभणी आणि धुळ्यात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Attempt Of Self Immolation

धुळेः संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानं राज्यात खळबळ उडाली होती. आता धर्मा पाटील यांच्या विखरण गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहनचा प्रयत्न केल्यानं पुन्हा एकदा ते प्रकरण चर्चेत आलंय. शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यानं सर्वच हादरलेत. पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. तर गावकऱ्यांनी पोलीस व्हॅन अडवित निषेध नोंदवला. रास्ता रोको करीत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. (Attempt Of Self Immolation Of Farmers In Satara, Parbhani And Dhule)

कोण आहेत धर्मा पाटील आणि नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, उपचारादरम्यान 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं होतं. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर नरेंद्र पाटील आणि त्यांच्या मातोश्रीने तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडलं होतं. माजी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती.
नरेंद्र पाटील यांनी 2018 मध्ये विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा इशाराही दिला होता. भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ नरेंद्र पाटलांनी हा पवित्रा घेतला होता. त्यानंतर मनसेत प्रवेश करुन नरेंद्र पाटील यांनी राजकारणात उडी घेतली होती.

साताऱ्यात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

साताऱ्यातील कण्हेर प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या पिंपरी शहापूर गावातील तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. संतोष वांगडे आणि आणखी दोन जणांनी हा प्रयत्न केलाय. जिल्हा प्रशासनाकडे 4 वर्षांपासून जादा आकारला जात असलेला महसूल कमी करण्याची मागणी करूनदेखील न्याय मिळत नसल्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्मदहनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय. शेतकरी आंदोलनात महिलांनी देखील रास्ता रोको केलाय. आंदोलनकर्त्यांना मारहाण केल्याचा शेतकरीच आरोप करीत असून, वातावरण तणावपूर्ण झालंय.

परभणी महापालिकेच्या आवारात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

परभणी महापालिकेच्या आवारात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलेय. शाहेद शमीम खान असं या व्यक्तीचं नाव आहे, शिवाय तो परभणी जिल्हा अल्पसंख्याक समितीचा सदस्य असून, भाजपचा कार्यकर्ता आहे. महापालिकेत एकूण किती कंत्राटी अभियंता आणि कर्मचारी आहेत, याची माहिती ते महिनाभरापासून महापालिकेला मागत होते. शिवाय अनेक विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. पण सदर माहिती ही दिली जात नसून त्या आरोपांची चौकशीसुद्धा केली जात नसल्याने शाहेद शमीम खान यांनी प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करू, असं निवेदन देऊन महापालिकेला इशारा दिला होता. पण याकडे मनपाने कानाडोळा केल्याने तक्रारकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. कंत्राटी अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींची कामे केली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खान यांनी केलाय. ज्यामध्ये दीडशे कोटींच्या पाणीपुरवठा योजना आहेत. शाही मशिदीपर्यंत बनवण्यात आलेल्या रोडचा समावेश आहे, नाना-नानी उद्यान आणि इतर काही कामांना महापालिकेने कार्यारंभ आदेश दिलाय. त्याची महापालिका आयुक्तांनी पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी या खान यांनी केली होती, यापैकी काहीच न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याबरोबर पोलिसांनी खान यांना ताब्यात घेतलं. या घटनेने प्रजासत्ताक दिनी एकच खळबळ माजलीये.

संबंधित बातम्या

धर्मा पाटलांच्या मुलाचा मनसेला रामराम, अजित पवारांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील राष्ट्रवादीत

Attempt Of Self Immolation Of Farmers In Satara, Parbhani And Dhule