धुळ्यात एसटी कंटेनरवर धडकून अर्धी कापली, भीषण अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू

धुळ्यात औरंगाबाद-शहादा एसटी बस कंटेनरला धडकून झालेल्या भीषण अपघातात बसचालकासह 13 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. ही धडक इतकी भीषण होती, की बसचा चक्काचूर झाला.

धुळ्यात एसटी कंटेनरवर धडकून अर्धी कापली, भीषण अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू

धुळे : औरंगाबाद-शहादा एसटी बसला धुळ्यात झालेल्या भीषण अपघातात (Dhule ST Bus Accident) 15 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 35 जण जखमी आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ काल (रविवारी) रात्री मालवाहू कंटेनर आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की बसची अर्धी बाजू अक्षरशः कापली गेली.

औरंगाबादहून नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याला जाणाऱ्या एसटी बसला रात्री उशिरा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस कंटेनरवर धडकल्यामुळे अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. अपघातामध्ये बसचालकाचा जागीच मृत्यू झाला, त्याचप्रमाणे बसमधील 12 प्रवाशांनाही जीव गमवावा लागला. सर्व मृत प्रवासी शहादा तालुका आणि शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अपघातानंतर बसचा काही भाग कंटेनरमध्ये शिरल्यामुळे दोन क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस आणि कंटेनर बाजूला करण्यात आले. त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे दहा हजार रुपयांची तात्काळ मदत, तर जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत.

सर्व जखमी प्रवाशांवर शहादा, दोंडाईचा, धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच जवळपासच्या नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी रिक्षा, कार, रुग्णवाहिका मिळेल ते वाहन अपघातस्थळी घेऊन जावं, असं आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *