चांगली गोष्ट करताना गैरमार्ग वापरला, तर हेतू कधीही शुद्ध नसतो; हायकोर्टाने सुजय विखेंना सुनावले

हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही, असा बचाव सुजय-विखेंच्या वकिलांनी केला. | Sujay Vikhe Patil

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:51 AM, 4 May 2021
चांगली गोष्ट करताना गैरमार्ग वापरला, तर हेतू कधीही शुद्ध नसतो; हायकोर्टाने सुजय विखेंना सुनावले
सुजय विखे-पाटील, भाजप खासदार

औरंगाबाद: एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावर ताशेरे ओढले. सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. (If Procedure To Do Good Is Illegal, It Doesn’t Make Purpose Good Bombay High Court To BJP MP Sujay Vikhe Patil On Remdesivir Procurement)

यावेळी सुजय विखे-पाटील यांच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही, असा बचाव सुजय-विखेंच्या वकिलांनी केला.

नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, रेमडेसिव्हीर वादावर सुजय विखे-पाटलांनी दंड थोपटले

न्यायमूर्ती काय म्हणाले?

सुजय विखे हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ते एक न्यूरोसर्जन आहेत. त्यांचे डॉ. विखे-पाटील स्मृती रुग्णालय एका रात्रीत मोठी झालेली संस्था आहे, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुजय-विखे यांच्या वकिलांनी म्हटले.

त्यावर न्यायमूर्ती घुगे यांनी खडे बोल सुनावले. तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता, असे न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले.

‘सुजय विखेंनी 10 हजार नव्हे तर फक्त 1200 रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली’

या सुनावणीदरम्यान सुजय विखे-पाटील यांनी 10 हजार नव्हे तर फक्त 1200 इंजेक्शन्स आणल्याचे स्पष्ट करण्यात आले. सुजय विखे यांच्या चार्टर्ड विमानात 15 बॉक्स होते. त्यामध्ये 1200 इंजेक्शन्स होती.

अहमदनगरमधील एका डॉक्टरने पुण्यातील एका कंपनीकडे रेमडेसिव्हिरच्या 1700 कुप्यांसाठी ऑर्डर बुक केली होती. यापैकी 500 कुप्या त्याला मिळाल्या होत्या. उर्वरित 1200 कुप्यांसाठी डॉ. पाटील फाऊंडेशनने त्याला 18,14,400 रुपये देऊन तो साठा विकत घेतला. त्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी संबंधित कंपनीच्या चंदीगढ येथील युनिटवर जाऊन रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा नगरमध्ये आणला, असे न्यायालयासमोर सांगण्यात आले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार असून त्यावेळी हा खटला फौजदारी असणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

संबंधित बातम्या :

खासगीरित्या ‘रेमडेसिव्हीर’चं वाटप करणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार? याचिकेतील सुधारणेसाठी अर्ज सादर

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

(If Procedure To Do Good Is Illegal, It Doesn’t Make Purpose Good Bombay High Court To BJP MP Sujay Vikhe Patil On Remdesivir Procurement)