औरंगाबाद जिल्हा म्हटलं की वेरुळ-अजिंठा, बिबी का मकबरा आशी दोन-तीन पर्यटनस्थळं आपल्या नजरेसमोर येतात. औरंगाबाद शहराच्या निर्मितीचा इतिहास मोठा रंजक आहे. हे शहर 1610 मध्ये निजामशाहाचा सरदार मलिक अंबर याने वसवले. या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हटले जाते. या शहराला पूर्वी खडकी असं म्हटलं जायचं. मुघल बादशाहा औरंगजेबाने आपली राजधानी औरंगाबादला आणली तेव्हा या शहरात अनेक बदल करण्यात आले. विशेष म्हणजे औरंगजेब त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगाबाद शहरातच राहिला. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद निजामांपासून मुक्त झाले. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा तत्कालीन बॉम्बे राज्यात विलीन करण्यात आला. त्यानंतर औरंगाबादची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. औरंगाबाद जिल्हा एकूण 10,100 चौ.कि.मी मध्ये विस्तारलेला आहे. त्यापैकी 141.1 चौ. कि.मी. शहरी तर 9587 चौ. कि.मी. ग्रामीण क्षेत्र आहे. जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र 135.75 चौ.कि.मी. आहे. महाराष्ट्राशी तुलना केल्यास औरंगाबादचे जंगल क्षेत्र 9.03% आहे. औरंगाबादेत गोदावरी, तापी, पूर्णा, शिव, खाम अशा मुख्य नद्या आहेत. तर दुधा, गलहती आणि गिरजा या उपनद्या आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार औरंगाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 37,01,282 आहे. अजिंठा – वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला, खुलताबाद, बीबी का मकबरा, घृष्णेश्वर मंदीर, पाणचक्की, जायकवाडी धरण आणि 52 दरवाजे यामुळे इतिहास समजण्यास सोपा जातो. जिल्ह्यात औरंगाबाद, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, वैजापूर आदी 9 तालुके आहेत. तर, जिल्ह्यात कन्नड, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद (पश्चिम), औरंगाबाद (पूर्व) आणि पैठण आदी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा