अवनी वाघीण आठवड्याभरापासून उपाशी होती, बछड्यांचाही भूकबळी?

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील ठार करण्यात आलेली नरभक्षक अवनी वाघीण आठवड्याभरापासून उपाशी होती, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. तिच्या दोन बछड्यांचाही अजून शोध सुरु आहे. पण या बछड्यांचा भूकेनेच बळी गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीच्या औषधाची सुई टोचण्यात आली होती की नाही याची तपासणी करण्यात आली. …

अवनी वाघीण आठवड्याभरापासून उपाशी होती, बछड्यांचाही भूकबळी?

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील ठार करण्यात आलेली नरभक्षक अवनी वाघीण आठवड्याभरापासून उपाशी होती, असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. तिच्या दोन बछड्यांचाही अजून शोध सुरु आहे. पण या बछड्यांचा भूकेनेच बळी गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीच्या औषधाची सुई टोचण्यात आली होती की नाही याची तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत वाघिणीच्या मुत्राचे नमुने, हृदयातील रक्ताचे नमुने, ज्या बंदुकीच्या गोळीने अवनी वाघिणीला ठार करण्यात आले त्या गोळीचे दोन तुकडे, हाडं आणि स्नायू तसेच गोळीमुळे तुटलेल्या बरगड्यांचे नमुने तपासण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागातील टी वन वाघिणीला मागच्या आठवड्यात मध्यरात्री गोळी घालून ठार करण्यात आलं. वाघिणीला मारण्याऐवजी बेशुद्ध करण्याचा पर्याय नव्हता का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. प्राणी मित्रांकडून या घटनेचा निषेध केला जात आहे.

राजकारण तापलं

वाघिणीला मारल्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अडचणीत आले आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही मुनगंटीवारांवर टीका केली आहे. शिवाय राज्यातील सर्वच पक्षांनी वाघिणीला मारण्याऐवजी पकडण्याचा प्रयत्न का केला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

इटालियन श्वान ते गजराज… वाघिणीच्या खात्म्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

भारताचे प्रसिद्ध गोल्फर ज्योती रंधावा हे सुद्धा त्यांचे प्रत्येकी सहा लाख किमतीचे केन कोर्स जातीचे दोन इटालियन श्वान घेऊन या भागात वाघीण जेरबंद करण्याच्या दृष्टीने दाखल झाले होते. मात्र, ते अयशस्वी ठरल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर मध्यप्रदेशातील कान्हा आणि महाराष्ट्रातील ताडोबामधून हत्तींनाही आणण्यात आले होते.

पवनपुत्र, विजय, हिमालय आणि शिवा, असे चार हत्ती मध्य प्रदेशातील कान्हा जंगलातून आणण्यात आले होते. हे चारही हत्ती भाऊ होते. एखाद्या वाघाला घेरुन त्याला जेरबंद करण्यात हे चार हत्ती पटाईत मानले जायचे. मात्र वाघीण हाती लागण्याच्या आतच या चार हत्तींची घरवापसी करण्यात आली. या हत्तींच्या घरवापसीला कारण ताडोबातील गजराज ठरला. गजराज साखळी तोडून पळाला आणि परिसरात नासधूस केली. शिवाय यात महिलेचा जीव गेला होता. त्यामुळे गजराजसह इतर चारह हत्तींनाही परत पाठवण्यात आलं होतं.

अवनीला वाचवण्यासाठी मोहीम

जवळपास 47 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील जंगलात ‘T1’ या नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात होता. या वाघिणीचा अखेर खात्मा करण्यात यश आलं. मात्र, ‘T1’ वाघिणीसाठी गेल्या काही दिवसांपासून प्राणीप्रेमींनी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. ‘अवनी’ असे या नरभक्षक वाघिणीला नाव देत, तिच्यासाठी राजकीय नेत्यांपासून अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच अवनीला वाचवण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला होता

दुसरीकडे, यवतमाळमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशतीत वावरणाऱ्या ग्रामस्थांनी वाघिणीच्या खात्म्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. फटाके फोडत, मिठाई वाटत आपला आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *