बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचं उद्घाटन, मुनगंटीवार म्हणतात नामकरणाचा युतीशी संबंध नाही

आम्ही सत्तेत सोबत नसलो, तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही, असं सुधीर मुनगंटीवार उड्डाणुुलाच्या उद्घाटनानंतर म्हणाले.

Balasaheb Thackeray Flyover Inaugurate, बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचं उद्घाटन, मुनगंटीवार म्हणतात नामकरणाचा युतीशी संबंध नाही

चंद्रपूर : चंद्रपुरात ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ उड्डाणपुलाचं भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन (Balasaheb Thackeray Flyover Inaugurate) करण्यात आलं. मात्र शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी काहीही संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ, आम्ही विचारांशी बांधील आहोत, असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.

चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं शिवजयंतीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आलं. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल’ असं याचं नामकरण करण्यात आलं.

भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महापालिकेने 2012 मध्येच या संबंधी ठराव घेतला होता. त्याची अंमलबजावणी काल करण्यात आली. अत्यंत आकर्षक अशा सोहळ्यात भाजप नेते आणि चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे नामकरण झाले.

विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्तेही थेट मंचावर उपस्थित राहिल्याने सेना-भाजप युतीचा धागा पुन्हा एकदा जुळवण्याचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

दरम्यान, आम्ही सत्तेत सोबत नसलो, तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही, असं मुनगंटीवार उद्घाटनानंतर म्हणाले.

‘आज शिवजयंतीचा मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे आणि जाणणारे, चांदा ते बांदा असलेल्या युवक-युवतींच्या हृदयापर्यंत तो विचार पोहचवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उड्डाणपुलाला देणं, याचा अर्थ युती किंवा सत्तेशी जोडता कामा नये.’ असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘काही नेते पक्ष किंवा सत्तेपेक्षा जास्त उंच असतात. त्यांचा विचार आकाशाने हेवा करावा, इतका मोठा असतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट म्हणून बहुसंख्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले होते, की हे राज्य छत्रपतींच्या विचारानेच पुढे जाईल. त्याचा संबंध कृपया युतीशी जोडू नका, जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा येऊ, पण याचा संबंध विचाराशी जोडला जावा’ असं आवाहन मुनगंटीवारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केलं.

आश्चर्य म्हणजे, फडणवीस सरकारच्या काळात सेना-भाजप युती असताना मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा प्रश्न होता, तेव्हा शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती, परंतु भाजप माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यास आग्रही होती. आता चंद्रपुरातील एका उड्डाणपुलाला का असेना, भाजपने ठाकरेंचं नाव दिल्याने नवल वर्तवलं जात आहे.

याआधी, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारी 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपमधील तमाम नेत्यांनी बाळासाहेबांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली होती. युती तुटल्यानंतर बाळासाहेबांची ही पहिलीच जयंती होती. त्यामुळे या निमित्ताने भाजप सेनेला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न त्यावेळी विचारला जात होता. (Balasaheb Thackeray Flyover Inaugurate)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *