कोरोनानं केली जावयांची सुटका, बीडमधील गाढवावरुन धिंड काढण्याची परंपरा 80 वर्षानंतर खंडित

बीडच्या विडा या गावातील जावयाला गाढवावर बसवून धिंड काढण्याची अनोखी परंपरा खंडित झाली आहे. Vida Village Son in law Donkey Procession tradition

कोरोनानं केली जावयांची सुटका, बीडमधील गाढवावरुन धिंड काढण्याची परंपरा 80 वर्षानंतर खंडित
बीडमधील जावयांची धिंड काढण्याची परंपरा खंडित

बीड: होळी, धुलिवंदन ते रंगपंचमी यादरम्यान महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक पंरपंरांचंन पालन केलं जातं. महाराष्ट्राच्या विविध भागात होळी ते रंगपंचमी वेगवेगळ्याप्रकारे साजरी केली जाते. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली बीड जिल्ह्यातील जावयांची गाढवावरील धिंड काढण्याची पंरपरा यंदा खंडित झाली आहे. केज तालुक्यातील विडा या गावात जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्याची अनोखी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा पहिल्यांदाच म्हणजे तब्बल 80 वर्षांनंतर खंडित झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच जावयाच्या गदर्भस्वारीचा आनंद ग्रामस्थांना घेता आला नाही. गाढवावर धिंड काढलेले गतवर्षीचे जल्लोषाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Beed Kej Taluka Vida Village Son in law Donkey Procession tradition on Holi Dhulivandan cancelled due to corona)

जावयांना मोठा दिलासा

कोरोनाने सगळ्यांनाच जेरीस आणले आहे, परंतु जावई मंडळींसाठी तो पर्वणी ठरला आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा खंडित झाली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथील जावयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या परंपरेला जवळपास 80 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे.

लॉकडाऊनचा फटका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. होळी, धुलिवंदन यासारखे सण साजरे करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे गदर्भ सवारीची ही प्रथाही खंडित झाली. गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची नामुष्की टाळण्यासाठी जावयांना लपून बसण्याची कसरत करावी लागते.

काय आहे परंपरा?

साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलिवंदनाच्या दोन दिवस आधीपासूनच जावईबापूंना शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकंही नेमली जातात. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसवण्याची तयारी करण्यात येते.

नवीन कपड्याचा आहेर

जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर दिला जातो. एकदा गाढवावर बसवण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसवण्यात येत नाही. सासरच्या मंडळीकडून अपेक्षा करत रुसवा फुगवा करणारे जावई धुलिवंदनाला गपचूप गाढवावर बसतात. धुलिवंदनाच्या या आनंदात गावकऱ्यांसह ते सुद्धा सहभागी होतात. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशातले एकमेव आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता

बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात 26 एप्रिल ते 4 मार्चपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.


संबंधित बातम्या:

कोरोना ‘जावयां’साठी पर्वणी, बीडमधील गाढवावरुन मिरवणुकीची परंपरा खंडित होण्याची चिन्हं

जावयाची गाढवावरुन जंगी मिरवणूक काढण्याची प्रथा, लपून बसलेल्या जावयांना शोधण्यासाठी पथकं

(Beed Kej Taluka Vida Village Son in law Donkey Procession tradition on Holi Dhulivandan cancelled due to corona)