‘मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेला धोका दिला’, शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे एक मोठं वक्तव्य करत असल्याचं स्पष्ट होत आहे. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचं वक्तव्य कुंडलिक खांडे या ऑडिओ क्लिपमध्ये करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
बीडमध्ये शिंदे गटाच्या नेत्याची शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत झालीय का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामागील कारणही तसंच आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील असल्याचा दावा केला जातोय. या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले आहेत. कुंडलिक खांडे हे शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख आहेत.
नेमकं संभाषण काय?
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे : मी बाप्पाचं पूर्ण काम केलं आहे. त्यांनी आता आपला दिलेला शब्द पाळावा. फक्त माझ्या गावातील 100-200 मतं पंकजा ताईला जास्त गेले. कारण ते करणं मला गरजेचं होतं.
शरद पवार गटाचे शिवराज बांगर : हो
कुंडलिक खांडे : मला जातीवादी शिक्का नको. ओबीसी मतांचा आपल्याला विधानसभेला फायदाच आहे. बाकी 376 बुथवरची यंत्रणाला मी बाप्पााला देऊन टाकली हेही तितकंच खरं. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेला धोका दिला.
शिवराज बांगर : नुसती यंत्रणा नाही, तर बाप्पाासाठी पैसेही दिले का?
कुंडलिक खांडे : नुसती यंत्रणा नाही तर मी लोकांना पैसे देखील दिले.
बीडमध्ये नेमकं काय घडलं होतं?
लोकसभा निवडणुकीत बीडमधील काँटे की टक्कर बघायला मिळाली होती. बीड लोकसभा मतदारसंघात खरी लढत ही भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यात बघायला मिळाली. ही लढत अतिशय चुरशीची ठरली. मतमोजणीच्या दिवशी शेवटपर्यंत बीडमध्ये कोण जिंकेल याबाबत सस्पेन्स काय राहिला. अखेर खूप कमी मतांच्या फरकाने बजरंग बाप्पा सोनवणे यांचा या निवडणुकीत विजय झाला. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.