नगरमध्ये भाजपला दिलासा, चारही उमेदवार पुन्हा रिंगणात

नगरमध्ये भाजपला दिलासा, चारही उमेदवार पुन्हा रिंगणात

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरु असताना, भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी अर्ज बाद झालेल्या चारही उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार आहे. कारण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आहेत. या चार उमेदवारांमध्ये भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र आणि सून यांचाही समावेश आहे.

भाजपचे चार आणि राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवला होता. अखेर औरंगाबाद खंडपीठाने यातील पाच उमेदवारांना दिलासा दिला असून, शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी सुरु आहे.

कुणा-कुणाचे अर्ज झालेले बाद?

सुवेंद्र गांधी – भाजप

दिप्ती गांधी – भाजप

प्रदीप परदेशी – भाजप

सुरेश खरपुडे – भाजप

योगेश चिपाडे – राष्ट्रवादी

बाळासाहेब बोराटे – शिवसेना (यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी सुरु आहे)

प्रकरण काय आहे?

अहमदनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 6 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला धक्का बसला होता. कारण 23 नोव्हेंबर रोजी खासदार पुत्रासह भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. अर्जांची छाननी करुन मध्यरात्री अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला होता. नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचा पुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती हे महापालिकेच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्या दोघांचेही अर्ज बाद झाले होते. शिवाय सुरेश खरपुडे आणि प्रदीप परदेशी या दोन भाजप उमेदवारांचेही अर्ज बाद ठरले होते. दुसरीकडे भाजपशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला होता.

नगरमध्ये काँग्रेस फुटली, 6 नगरसेवक भाजपात!

भाजपच्या सुवेंद्र गांधी यांनी  प्रभाग क्रमांक 11 मधून तर त्यांची पत्नी दिप्ती गांधी यांनी प्रभाग 12 मधून अर्ज दाखल केला होता. दोघांच्या अर्जावर अनुक्रमे गिरीश जाधव आणि संभाजी कदम यांनी आक्षेप घेतला होता. अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरत गांधींवर आरोप करण्यात आले होते. त्याबाबत दुपारी सुनावणी झाल्यानंतर या अर्जावरील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज पहाटे 2.30 वाजता दोघांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते.

महानगरपालिकेत सत्ता कोणाची?

अहमदनगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 तर एकूण मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 इतकी आहे. नगर पालिकेत 17 प्रभागात 68 वार्ड आहेत.

आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे महापौर झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतला पराभव वगळता, शिवसेना नेहमी शहरात वरचढ राहिलेली आहे. तर भाजपादेखील एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी मोठ्या ताकदीने रिंगणात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. शिवाय त्यानंतर लगेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे नगरकरांसह राज्याचं लक्ष लागलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI