...तर प्रत्येक घरात जमिनीचे तुकडे होतील : हरिभाऊ बागडे

शिर्डी : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. छोट्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत दिल्याने प्रत्येक घरात जमिनीचे तुकडे केले जातील, अशी भीती व्यक्त करत, हरिभाऊ बागडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. देवळाली प्रवरा येथील कृषी मेळाव्यात हरिभाऊ बागडे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे …

...तर प्रत्येक घरात जमिनीचे तुकडे होतील : हरिभाऊ बागडे

शिर्डी : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. छोट्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत दिल्याने प्रत्येक घरात जमिनीचे तुकडे केले जातील, अशी भीती व्यक्त करत, हरिभाऊ बागडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. देवळाली प्रवरा येथील कृषी मेळाव्यात हरिभाऊ बागडे बोलत होते.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नेमकं काय म्हणाले?

“अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे. त्यामुळे पडीक जमीनीतही आता पेरणी होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणामुळे जमिनीचे तुकडे पडतील. आता प्रत्येक घरात जमिनीचे तुकडे केले जातील. कोणीही मोठा शेतकरी आता आगामी काळात दिसणार नाही.”, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

“वाटण्या होत होत आता शेकडो एकर शेती असणारे शेतकरी आता हळुहळू अल्पभूधारक होत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पाच एकराखालील शेतकऱ्याला आता 6 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत. पाच एकरावरील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याने त्या जमिनीचा आता बटवारा होईल.. बहीण, बायको, मुलाच्या नावावर जमिनी होतील. 2009 मध्ये ही खातेफोड झाली होती आता ही लाभ मिळण्यासाठी खातेफोड होईल. यापुढे एकराऐवजी आता गुंठ्ठ्यावर बोलावं लागेल. नवीन तंत्रज्ञानामुळे कमी जमिनीत ही चांगलं उत्पन्न घेता येईल.”, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने नेमकी काय घोषणा केली?

मोदी सरकारने अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी सरकारने 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातील. म्हणजेच, महिन्याला प्रत्येक शेतकऱ्याला 500 रुपये मिळतील. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल. 1 डिसेंबर 2018 पासून योजना लागू असेल. देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ होईल, असा दावा अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडताना केला.

योजनेसाठी पात्रता काय?

अर्थमंत्री पियुष गोयल यांनी हे अंतरिम बजेट सादर केलं. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना असं या योजनेला नाव देण्यात आलंय. पैशांअभावी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या रकमेचा फायदा होईल. दोन हेक्टर म्हणजेच पाच एकर शेती असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.

नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांवरील संकट हटत नाही. जीवनावश्यक गरज भागवण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना या रक्कमेमुळे हातभार लागेल, असं अर्थमंत्री म्हणाले. या योजनेचा फायदा देशातील 12 कोटी कुटुंबांना होईल. शिवाय योजनेचा वर्षाला एकूण खर्च 75 हजार कोटी रुपये असेल.

पैसे खात्यात कधीपासून येणार?

1 डिसेंबर 2018 पासूनच ही योजना लागू असेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी रक्कमेचा पहिला हफ्ता 31 मार्च 2019 पासून दिला जाईल, असं पियुष गोयल यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांना हा पैसा देण्यासाठी नवीन खातं उघडण्याची गरज नसेल. जनधन योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अगोदरच खातं उघडलेलं आहे आणि ते आधारशी लिंक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचण येणार नाही.

शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीने मोदी सरकार प्रयत्न करत असल्याचं पियुष गोयल म्हणाले. यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना पिकाच्या खर्चाच्या दीड पट किमान हमीभाव देण्याची घोषणा केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *