मुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आता शिवसेना-भाजप महायुतीत खोडा घालणारे विधान केले आहे.

मुख्यमंत्रिपदावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचा शिवसेनेला जहरी टोला

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आता शिवसेना-भाजप महायुतीत खोडा घालणारे विधान केले आहे. “कोण काय म्हणतं, कोण काय छापतं, याला काहीही महत्त्व देऊ नका” असे म्हणत मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी टोमणा मारला आहे. शिवसेनेने वर्धापन दिनानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात अनेक संकल्प करण्यात आले होते. याच अग्रलेखावरुन भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

अवधूत वाघ काय म्हणाले?

“कोण काय म्हणतं, कोण काय छापतं, याला काहीही महत्त्व देऊ नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील पाच वर्षांसाठी रिकामी नाही.” असे म्हणत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा नेता बसावा, ही शिवसेनेचं स्वप्न आहे. याआधी मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या रुपात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, आता मोठ्या संख्येत जागा निवडून आणून शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा, असा मानस अनेकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेतील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षा भाजपच्यागी मागे सरत गेला आहे. त्यामुळे 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बनला.

मात्र, आता म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करुन रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे कुणाच्या जास्त जागा येतील, यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपद कुणाकडे द्यायचे हे ठरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणं तसे नवल नाही. मात्र, या स्वप्नाला आता मित्रपक्ष भाजपच्या गोटातूनच खोडा घातला जातो आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण अवधूत वाघ यांनी या खोड्याला सुरुवात केल्याचे दिसते आहे.

दरम्यान, अवधूत वाघ हे भाजपचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातून आता अवधूत वाघ यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *