एल्गारचे ना वक्ते माहिती ना परिषदेचा उद्देश, मग पोलिसांनी परवानगी कशी काय दिली?, ब्राह्मण महासंघाचा सवाल

एल्गारचे ना वक्ते माहिती ना परिषदेचा उद्देश, मग पोलिसांनी परवानगी कशी काय दिली?, असा सवाल ब्राह्मण महासंघाने विचारला आहे.

  • अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 15:02 PM, 24 Jan 2021
एल्गारचे ना वक्ते माहिती ना परिषदेचा उद्देश, मग पोलिसांनी परवानगी कशी काय दिली?, ब्राह्मण महासंघाचा सवाल

पुणे :  पुणे पोलिसांनी अखेर एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे ही परवानगी मागितलेली होती. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. 30 जानेवारीला ही परिषद होणार आहे. पुणे पोलिसांच्या परवानगीवर ब्राह्मण महासंघाने आक्षेप नोंदवत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Brahmin Mahasangh Anand Dave Question Pune Police Over elgar parishad)

ब्राह्मण महासंघाने आज (रविवार) पुण्याच्या स्वारगेट पोलिसांना निवेदन देत एक महिन्यात असा काय फरक पडला की तुम्ही एल्गार परिषदेला परवानगी दिली?, असा सवाल केलाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून 1 जानेवारीला एल्गारच्या आयोजनाला नकार देणारे पोलीस 30 जानेवारीला मात्र परवानगी देत आहे. ना वक्ते माहिती आहेत, ना परिषदेचा उद्देश ना निम्मित ना गरज…? पण परवानगी मात्र दिली. ती कोणच्या कारणामुळे दिली?, असे सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केले आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण मान्य आहे पण अभिव्यक्तीच्या नावाखाली स्वैराचार होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. प्रशासन त्या निम्मिताने काय काळजी घेणार आहे ते पण त्यांनी एकदा स्पष्ट करावे, अशी मागणी दवे यांनी केली.

परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना योग्य समज आणि बंधने प्रशासनाच्या वतीने दिली जावी, अशी मागणी करताना माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांना सुद्धा आम्ही आमच्या वतीने एक पत्र देणार असून त्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे, असंही आनंद दवे यांनी सांगितलं.

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी

गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून  झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. ही परिषद येत्या शनिवारी (30 तारखेला) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी अर्ज स्वारगेट पोलिसांकडे दिला होता.

भाजप तसंच उजव्या विचारसरणीच्या लोकांनी, पक्षांनी किंबहुना संस्थांनी पुण्यातील एल्गार परिषदेच्या आयोजनाला कायमच विरोध केलाय. ही परिषद होऊ नये म्हणून तत्सम मंडळींनी जोरदार प्रयत्न केले. मात्र असं असतानाही आता 30 जानेवारीला ही परिषद पुण्यात पार पडतीय. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे किंबहुना हालचालीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल.

(Brahmin Mahasangh Anand Dave Question Pune Police Over elgar parishad)

संबंधित बातम्या

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद होणार, आता भाजप नेमकं काय करणार?

सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली