बाजारासाठी आईला दुकानावर पाठवून युवक काँग्रेस तालुकाध्यक्षाचा गळफास!

  • गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलडाणा
  • Published On - 10:36 AM, 7 May 2019
बाजारासाठी आईला दुकानावर पाठवून युवक काँग्रेस तालुकाध्यक्षाचा गळफास!

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सुरडकर (वय 35) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र सुरडकर यांनी गळफास घेण्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नाही.

सकाळच्या सुमारास सुरडकर यांनी त्यांच्या आईला किराणा दुकानात सामान आणायला पाठवले होते. मात्र त्यांची आई दुकानातून परत आल्यावर रमेश हे घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले.

मुलगा लटकलेला दिसताच आईने हंबरडा फोडला, त्या आवाजाने शेजारी धावत आले. रमेश सुरडकर हे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांचे अतिशय निकटवर्तीय होते.

मनमिळावू स्वभाव असल्याने, विविध पक्षातील राजकीय व्यक्तींसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या आत्महत्येने गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून रमेश सुरडकर यांनी आत्महत्या का केली ?  याचा तपास पोलीस करत आहेत.