वर्क फ्रॉम होम राबवा आणि मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील, याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आज दिल्यात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:46 PM, 23 Feb 2021
वर्क फ्रॉम होम राबवा आणि मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी सचिवांना काही निर्देश दिलेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये बसवता येतील का पाहा. तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील, याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आज दिल्यात. (Carry Out Work From Home And Do Office Hours In The Ministry In Two Shifts, As Directed By The Chief Minister)

पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी: मुख्यमंत्री

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे.

मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे, याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिलेत.

अभ्यागतांना मर्यादित प्रवेश

मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत.

कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटिजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून मंत्रालयात संसर्ग असलेली आणि आजारी व्यक्ती येणार नाही, याची खात्री करता येऊ शकेल. यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली, या बैठकीत महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, तसेच मंत्रालय अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णू पाटील, मुख्य सचिव संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा :

राज्यपाल विरुद्ध सरकार संघर्ष पुन्हा उफाळणार; आता विधानसभा अध्यक्षपद कारण ठरणार

ठाकरे मंत्रिमंडळाचे तीन मोठे निर्णय; राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविणार

Carry Out Work From Home And Do Office Hours In The Ministry In Two Shifts, As Directed By The Chief Minister