राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा

राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा

लक्ष्मीकांत घोणसे पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर शुक्रवारी रात्री खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोटे पंचक्रोशीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्यामुळे वाद चालू होता. या दूषित पाण्यामुळे गावकरी त्रस्त आहेत. नागरिकांनी याबद्दलची तक्रार आमदार संजय कदम यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार कदम यांनी लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाला भेट दिली. दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बोलत असताना झालेल्या बाचा-बाचीतून आमदार संजय कदम यांनी तेथील अधिकाऱ्याला मारहाण केली.

या मारहाणीप्रकरणी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांवरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संजय कदम हे रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांचा निसटता पराभव केला होता.

1990 पासून दापोली विधानसभेवर शिवसेनेची मजबूत पकड होती. 1990 पासून तेथे सेनेचे सूर्यकांत दळवी हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.