नाशिकमध्ये झोपडपट्टीत लाखो रुपयांचं पैशांचं घबाड, कसारा घाटात अडवलेल्या वाहनात 2 कोटी, तर दिंडोशीतही लाखो रुपये
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना, लाचखोरी रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. मुंबई, नाशिक आणि शहापूरसह विविध ठिकाणी कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून या पैशांचा राजकीय पक्ष किंवा उमेदवारांशी संबंध आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या काळात निवडणुकीत मतदारांना वळवण्यासाठी पैशांचं आमिष दिलं जातं. त्यामुळे अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. पोलिसांकडून राज्यभरात अशाप्रकारची कारवाई सुरु आहे. या कारवाईतून आतापर्यंत कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. त्या पैशांचा कोणत्या पक्षाशी किंवा पक्षाच्या उमेदवारांसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. अशाप्रकारच्या कारवाईत राज्यात मुंबईतील दिंडोशी, नाशिक, शहापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैशांचं घबाड सापडलं आहे. नाशिकमध्ये झोपडपट्टीत लाखो रुपयांचं पैशांचं घबाड सापडलं आहे.
नाशिकमध्ये झोपडपट्टीत सापडले पैशांचं घबाड
नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान 20 लाख 50 हजार तर उपनगर परिसरातील घर झडतीत 11 लाख रुपये सापडले. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भालेराव मळा परिसरातील झोपडपट्टीत पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. घर झडतीत सापडलेल्या पैशांतून 21 वर्षीय तरुणाला आणि नाकाबंदी दरम्यान कारमध्ये सापडलेल्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांची किंमत एकूण 31 लाख इतकी आहे. पोलिसांना सापडलेल्या पैशांचा राजकीय व्यक्ती किंवा पक्षाशी संबंध आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दिंडोशीत लाखो रुपये जप्त
मुंबई पश्चिम उपनगरातील दिंडोशी परिसरात 7,80,440 रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांच्याकडे पैशांची बॅग होती. आचारसंहिता पथकाची दिंडोशी परिसरात नाकाबंदी सुरू असताना त्यांनी एक बाईक अडवली. यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वारांच्या बॅगेची तपासणी केली. यावेळी बॅगेत पैसे आढळून आले. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे दिंडोशी पोलिसांना आणखी एका दुचाकीस्वाराकडे साडेसहा लाख रुपयांची कॅश मिळाली.
दिंडोशी पोलिसांना रूटिंग चेकिंग दरम्यान 6.5 लाखांची रोकड सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोशी येथे पोलिसांच्या तपासणीदरम्यान दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीकडून साडेसहा लाख रुपये जप्त करण्यात आले. ही रक्कम ज्वेलर्सची असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तरीही दिंडोशी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
शहापूरमध्ये सापडली 2 कोटींची रोख रक्कम
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांनी पकडले. रक्कम मोजण्याचे काम सुरू आहे. शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलीस चौकी जवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी सुरु असताना MH 11 BV 9708 गाडीत रोक रक्कम आढळून आली. वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. संबंधित वाहन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होती. प्राथमिक माहितीनुसार, गाडीत 2 कोटी रुपयांची रक्कम आढळली आहे.