बालदिन विशेष : राज्यात आजही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : आज बाल दिवस…पण हा बाल दिवस साजरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हा प्रश्न यासाठी उपस्थित केला जातोय. कारण, या देशातील लाखो कोवळ्या कळ्या आजही शिक्षणाविना कोमेजत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातच शाळाबाह्य मुलांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. तर राज्यात पाच लाख मुलं आजही शाळाबाह्य …

बालदिन विशेष : राज्यात आजही लाखो मुलं शिक्षणापासून वंचित

गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : आज बाल दिवस…पण हा बाल दिवस साजरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हा प्रश्न यासाठी उपस्थित केला जातोय. कारण, या देशातील लाखो कोवळ्या कळ्या आजही शिक्षणाविना कोमेजत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातच शाळाबाह्य मुलांची संख्या तीन हजारांच्या आसपास आहे. तर राज्यात पाच लाख मुलं आजही शाळाबाह्य आहेत म्हणजेच ते शिक्षणापासून वंचित आहेत, अशी धक्कादायक माहिती शिक्षण आणि भटक्यांसाठी काम करणाऱ्या संघर्ष वाहिनीने दिली आहे. शाळाबाह्य मुलांवर आज बालदिनी ‘टिव्ही 9 मराठी’ने प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे.

हातात कढई घेऊन विकणारी ही आहे राधा नावाची मुलगी. राधा मूळची राजस्थानची गाडिया लोहार या भटकंती करणाऱ्या समाजातली आहे. पोट भरण्यासाठी हा समाज वर्षभर देशभरात भटकंती करतोय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची 8-10 कुटुंब नागपुरात आहेत. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागणार आहे.

राधाही जन्मापासूनच त्यांच्यासोबत भटकंती करत आहेत. राधा नऊ वर्षांची आहे. पण तिने अद्यापही शाळेची पायरी चढली नाही. राधासोबतच गाडिया लोहार समाजाच्या 10 ते 15 मुलांनी कधी शाळेची पायरीही चढली नाही. ही मुलं घटनेने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारापासून आजंही वंचित आहेत.

राधाचे काका सांगतात… त्यांचं मूळ राजस्थान चित्तोड असून, ते महाराणा प्रताप यांच्या वंशातील आहेत. पण शेतीवाडी नसल्याने पोट भरण्यासाठी त्यांच्या कित्येक पिढ्या देशभर भटकंती करतात. त्यांची मुलंही शाळेत न जाता त्यांच्यासोबत भटकंती करत असतात. आम्हाला एका ठिकाणी पोट भरता येईल, यासाठी सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवू शकत नसल्याचं ते सांगतात.

राधा, रेखा, आकाश, दिनेश, कालू… आम्ही सर्वांना विचारलं, पण कुणीही शाळेची पायरी कधी चढलीच नाही. अशाच प्रकारे भटकंती करणारे एकट्या नागपूर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त शाळाबाह्य मुलं आहेत. यात भारवाड समाज, शहरातील इमारत बांधकाम मजूर, धनगर, अशा समाजातील मुलं आहेत.

महाराष्ट्रातील भीषण वास्तव

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आजही राज्यात पाच लाख मुलं शाळाबाह्य आहेत आणि ते शिक्षणापासून वंचित आहेत, अशी धक्कादायक माहिती भटक्या समाजासाठी काम करणाऱ्या संघर्ष वाहिनीचे संयोजक दिनानाध वाघमारे यांनी दिली आहे.

देशात 11 ते 14 वयोगटातील 16 लाखांपेक्षा जास्त मुली शाळाबाह्य आहेत. त्यात महाराष्ट्रातील 56 हजार मुलींचा समावेश आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाने दिली. शाळाबाह्य मुलांचा आकडा यापेक्षाही किती तरी पट जास्त आहे. मुलं आणि मुली मिळून शाळाबाह्य मुलांची सख्या यापेक्षा जास्त आहे, असं शिक्षण क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात. कारण शाळाबाह्य मुलं शहरात नसून जंगल, पाडे, खानमजूर, ऊसतोड कामगार यांची आहेत. या मुलांपर्यंत शिक्षणाचा अधिकार अजून पोहोचला नाही, ही खरी शोकांतिका आहे.

या देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला संविधानाने शिक्षणाचा अधिकार दिलाय. पण आजही भटकंती करणाऱ्या समाजाची अनेक मुलं या शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित आहेत आणि शिक्षणाशिवाय यांच्या पिढ्या उद्ध्वस्त झाल्यात. ज्या देशात पुतळ्यांचं राजकारण केलं जातं, तिथे देशाचं भविष्य असलेल्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसं गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही, असा आरोपही केला जातोय. हा आरोप जरी असला तरी वास्तव आपल्या आजूबाजूलाच आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *