तुमच्या पणजोबा, आजीने गरिबी हटवली नाही, तुम्ही काय हटवणार : मुख्यमंत्री

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:32 AM, 9 Apr 2019
तुमच्या पणजोबा, आजीने गरिबी हटवली नाही, तुम्ही काय हटवणार : मुख्यमंत्री

लातूर: “राहुलबाबा आले, भाषण करुन गेले. जे काही बोलले ते काल्पनिक आहे. त्यात काही एक तथ्य नाही. 72 हजार कुठून देणार, हे पैसे येणार कुठून असा सवाल करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, तुमच्या पणजोबा, आजीने गरिबी हटावचा नारा दिला, पण हटली नाही”, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केला. लातूरमधील औसा इथं आज शिवसेना-भाजप युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले.

मुख्यमंत्री म्हणाले, “मोदीजी आणि उद्धवजी जिथं येतात तिथं रेकॉर्ड होतं. लातूर आणि उस्मानाबादमधील ही सभा रेकॉर्डब्रेक असेल, या दोन्ही युतीच्या जागा विक्रमी मताने जिंकून येतील. ही निवडणूक दिल्लीची आहे, गल्लीची नाही, हा देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे ते ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडील भुईसपाट करा”

तुमच्या पणजोबाने, तुमच्या आजीने, वडिलांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. काँग्रेस सरकारमध्ये केवळ भ्रष्टाचार दिसला, आमच्या सरकारमध्ये विकास दिसला. ही निवडणूक कुणा एका उमेदवाराची नाही तर देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. भारताचे संविधान आणि तिरंगा मजबूत करण्याची निवडणूक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.