मुख्यमंत्री, राज्यपालांसह 16 आजी-माजी मंत्री भंडाऱ्यात; पाच दिवस उलटूनही एकावरही कारवाई नाही

मुख्यमंत्र्यांनी भंडारा दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं होतं मात्र 5 दिवस उलटूनही दोषींवर कारवाई झालेली नाही.

  • अनिल आक्रे, टीव्ही 9 मराठी, भंडारा
  • Published On - 22:02 PM, 13 Jan 2021
Chief Minister

भंडारा :  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात 8 जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. आज या घटनेला पाच दिवसाचा कालावधी लोटला असला तरी आद्यपही कुणावरही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपालांसह 16 आजी-माजी मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन घटनास्थळाची परिस्थिती जाणून घेऊन घेतली होती. तसंच मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं होतं. CM, Governor and Some ministers Visit Bhandara but No action has been taken against culprits in Bhandara Case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा घटनेचा तपास करण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी नेमली. काल (मंगळवार) 12 जानेवारीला या समितीने रुग्णालयात येत चौकशी केली. मात्र शासनाकडे अद्यापही चौकशी अहवाल सादर झाला नाही.

दुसरीकडे आतापर्यंत भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 16 च्या वर आजी माजी मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि स्वतः राज्यपाल येऊन गेले. मात्र मृतांच्या कुटुंबीयांना याचा काहीही फायदा झाला नाही. त्याचे अश्रू अजूनही पुसले गेले नाहीत. त्यामुळे चौकशी समिती आपला अहवाल कधी सादर करणार आणि दोषींवर कधी कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

मंत्रिमंडळ बैठकीत भंडारा जिल्हा रुग्णालय आग दूर्घटनेबाबत गंभीर चर्चा

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटमधील आग प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सखोल चौकशी करीत असून या समितीला चौकशीसाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे, ही समिती आता येत्या रविवारी आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकारी यांना व्हीसीद्वारे सुरक्षा विषयक ऑडिट तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक अग्निशमन यंत्रणा व संबंधित विद्युत विभाग यांनी देखील आपल्या क्षेत्रातील शासकीय रुग्णालयांना नियमितपणे भेटी देऊन वीज व अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित आहे का? याची तपासणी करीत जावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

भंडाऱ्याला भेट दिलेले आजी-माजी मंत्री-नेते

1) माजी मंत्री चंद्रशेखर बावकुळे 2) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 3) आरोग्य मंत्री राजेश टोपे 4) विधानसभा अध्यक्ष-नाना पटोले

5)भुकंप पुनर्वसन मंत्री-विजय वडेट्टीवार 6)भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम 7) गृहमंत्री- अनिल देशमुख 8) उच्च शिक्षणमंत्री- अमित देशमुख

9) वनमंत्री संजय राठोड 10) आरोग्य राज्यमंत्री -राजेंद्र पाटील एड्रावकर 11) माजी पालकमंत्री- परीणय फुके 12) मुख्यमंत्री- उध्दव ठाकरे

13) भाजप नेत्या-चित्रा वाघ 14) राज्यसभा खासदार-प्रफुल्ल पटेल 15) वंचित आघाडीचे नेते-प्रकाश आंबेडकर 16) महिला आणि बालकल्याण मंत्री- यशोमती ठाकूर

17) मंत्री एकनाथ शिंदे 18) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

(CM, Governor and Some ministers Visit Bhandara but No action has been taken against culprits in Bhandara Case)

संबिधित बातम्या

Bhandara | भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश