Gopichand Padalkar | पुणे, बीडपाठोपाठ पडळकरांविरोधात आणखी एक तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात वसईत तक्रार दाखल करण्यात आली आहे (Complaint file against Gopichand Padalkar).

Gopichand Padalkar | पुणे, बीडपाठोपाठ पडळकरांविरोधात आणखी एक तक्रार दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात वसईत तक्रार दाखल करण्यात आली आहे (Complaint file against Gopichand Padalkar). राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माणिकपूर पोलिसांनी राजाराम मुळीक यांची तक्रार बारामती शहर पोलिसांकडे वर्ग केली आहे (Complaint file against Gopichand Padalkar).

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत’, अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या जहरी टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात पडळकरांचा निषेध करत आंदोलनं केली. याशिवाय बारामतीत पोलीस ठाण्यात पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता वसईतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बीडच्या शिरुर कासार पोलीस ठाण्यातही पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहबूब शेख यांनी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि प्रतिमा जाळत आंदोलन केलं होतं. पडळकरांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढत चालला आहे. त्यामुळे पुणे, बीड पाठोपाठ वसईतही त्यांच्यावरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्याम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पडळकरांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. “गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचा तपास लवकरच समोर येईल. ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्याचदिवशी राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल. अहवाल प्राप्त झाला की पुढची कारवाई केली जाईल”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

पडळकर काय म्हणाले होते?

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.

दरम्यान, शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेली वैयक्तिक टीका ही भाजपची भूमिका नाही, असं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *