पालखी मार्गांसाठी बैठकावर बैठका, 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार?

12 हजार कोटी रुपयांचा खर्च या पालखी महामार्गासाठी होणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:16 PM, 22 Jan 2021
पालखी मार्गांसाठी बैठकावर बैठका, 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार?

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. (Complete The Work Of Palakhi Routes By 31st March, Says Deputy Chief Minister Ajit Pawar)

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

7 जानेवारीला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावे. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा, असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. केंद्रीय रस्ते आणि विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही 7 जानेवारीला संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग होणार असल्याची घोषणा केली. 12 हजार कोटी रुपयांचा खर्च या पालखी महामार्गासाठी होणार आहे.

कसा आहे पालखी मार्ग?

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग

पुण्यातील हडपसरपासून मोहोळपर्यंत संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग विकसित केला जात असून, सुमारे 234 किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असून, सोयीसाठी दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आलेत. हा महामार्ग सासवड-जेजुरी-निरा-लोणंद-फलटण-नातेपुते-माळशिरस-वाखरी-पंढरपूर या गावांच्या हद्दीतून जातो. सुरक्षिततेसाठी काही गावांना बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केलेत. यासाठी अंदाजे 3 हजार 966 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भूसंपादनासह अंदाजे एकूण 7 हजार 265 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग

पुणे जिल्ह्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत संत तुकाराम महाराज महामार्ग विकसित केला जात असून, 136 किमीच्या या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आलेत. हा मार्ग बारामती-निमगाव केतकी-इंदापूर-अकलुज-वाखरी या गावांमधून जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गावांना वळणरस्ते प्रस्तावित केलेत. या महामार्गासाठी अंदाजे बांधकाम खर्च 2 हजार 363 कोटी रुपये असून भूसंपादनासह एकूण खर्च 4 हजार 415 कोटी रुपये अपेक्षित आहे.

संबंधित बातम्या

तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज, 50 वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

उत्तर भारताचा वाहनांचा लोंढा आता मुंबईला न येताच दक्षिणेत जाणार, कसा? वाचा गडकरींच्या मोठ्या घोषणा

Complete The Work Of Palakhi Routes By 31st March, Says Deputy Chief Minister Ajit Pawar