काँग्रेसला धक्का, रणजिंतसिंह नाईक निंबाळकर लवकरच भाजपात जाणार

काँग्रेसला धक्का, रणजिंतसिंह नाईक निंबाळकर लवकरच भाजपात जाणार

सातारा : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. सातारा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. करमाळा येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना आमदार नारायण पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांची भाजप प्रवेशाबाबत बैठक पार पडली.

तीनही नेते सोमवारी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. सध्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणजित हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र असून फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली असून माढा लोकसभा मतदारसंघात स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांचं नेटवर्क उभं आहे.

फलटण नगरपालिकेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवक, तसेच फलटण पंचायत समितीत 2 सदस्य आणि सातारा जिल्हापरिषदेत 1 सदस्य कार्यरत आहे. यामुळे या पुढील काळात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आणि भाजपमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी दोघांची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने माढ्याची लढत प्रतिष्ठेची केली आहे. पण अगोदर मोहिते पाटील घराणं आणि यानंतर फलटणमधील निंबाळकर घराणं भाजपाच्या बाजूने असल्यामुळे आणखी चुरस निर्माण झाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *