गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? नाना पटोलेंचा भाजपला सवाल

गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
NANA PATOLE

मुंबई : अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच भाजप नेत्यांचे सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी पक्षासारखे नाही. महाराष्ट्र विरोधी पक्षासारखे आहे, असा घणाघातही त्यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचे काम

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील नांदेड, मालेगाव व अमरावती शहरात झालेले प्रकार हा चिंतेचा विषय आहे. राज्य सरकारने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून परिस्थिती चिघळवून धार्मिक विद्वेष कसा पसरवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वास्तविक पाहता महाराष्ट्र शांत रहावा यासाठी एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजपने पुढाकार घ्यायला हवा होता. पण भाजपचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. भाजप नेत्यांची वक्तव्ये पाहता ते लोकांना दंगलीसाठी भडकावत असल्याचे दिसत असून ते विरोधी पक्षाचे नेते आहेत का असा सवाल नाना पटोले यांनी केला.

महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांनी सुरु केला

तसेच गुजरातमध्ये गोध्रा दंगलीसारखे प्रयोग करुन देशभर त्याचे लोण पसरवण्याचे काम भाजपने केले. आता त्यांच्याकडून महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करुन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आग लावण्याचा धंदा काही नेत्यांनी सुरु केला आहे. परंतु महाराष्ट्राची सुज्ञ आणि समंजस जनता त्यांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नाही. भाजप नेत्यांनी हा आततायीपणा सोडून महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.

इतर बातम्या :

12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

अनिल परबांना केबल कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम सोप्पं वाटतं का?; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI