काँग्रेसमध्ये काहीतरी मोठं घडतंय, विधानसभेला काही विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार, सूत्रांची माहिती
आगामी विधानसभा निवणुकीआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. काँग्रेस काही विद्यमान आमदारांचं तिकीट कापून त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांकडून अतिशय महत्त्वाची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा सर्वाधिक फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे. या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक गट हा सत्तेत आहे. दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे या पक्षांची ताकद आता विभागली गेली आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांमधील फक्त काँग्रेस हाच पक्ष एकसंघ आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आता आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी काँग्रेस उमेदवारी देताना खूप काळजी घेणार आहे. यासाठी काँग्रेस काही विद्यमान आमदारांचं तिकीटही कापणार आहे.
विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस पक्ष विधानसभेच्या तिकीटाची वाटप करणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मतदारसंघात ज्यांचं काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी आमदारांच्या कामाचा अहवाल जमा करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“हायकमांडने हा निर्णय घेतला आहे की, कुठल्याही बदमाशांना आता विधानसभेचं तिकीट द्यायचं नाही. काही लोकं व्यापारासाठी येतात, अशा कुठल्याही बदमाशांना या पत्रात स्थान दिलं जाणार नाही. तशी भूमिका काँग्रेसची आहे”, असं नाना पटोले म्हणाले आहेत. तसेच “आम्ही कुणालाही अभय दिलेलं नाही. ज्यांची चूक समोर आली आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. चुकीला माफी नाही”, अशी भूमिका काँग्रेस हायकमांडची आहे.
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, जागा वाटपावर चर्चा होणार?
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. यावेळी या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.