Video: महाराष्ट्राचा नवा वाद, लेखक शरद तांदळेंच्या भाषणावर काही महाराजांचा आक्षेप, तुम्ही प्रत्यक्ष पाहा व्हिडीओ

प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी वारकरी संप्रदायावर केलेल्या वक्तव्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेतलाय.

Video: महाराष्ट्राचा नवा वाद, लेखक शरद तांदळेंच्या भाषणावर काही महाराजांचा आक्षेप, तुम्ही प्रत्यक्ष पाहा व्हिडीओ


मुंबई : महाराष्ट्रात आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी वारकरी संप्रदायावर केलेल्या वक्तव्यावर वारकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. तसेच शरद तांदळे यांनी आपली वक्तव्यं मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी केलीय. त्यांचं वारकरी संप्रदायातील हे भाषण मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यात काही लोक या वक्तव्यांवर टीका करत आहेत, तर काही लोक ते म्हणत आहेत तशी अनेक उदाहरणं वारकरी संप्रदायात असल्याचं सांगत वारकरी संप्रदायाने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं म्हणत आहेत (Controversy over statement of writter Sharad Tandale on Varkari Community).

शरद तांदळे नेमकं काय म्हणालेत?

शरद तांदळे म्हणाले, “खेड्यात पाच पंचवीस लोकं एकदा बाबा म्हणून पाया पडले की अख्ख गाव पाया पडतं. त्याला खूप हुशार असण्याची गरज नाही. खूपच काही झालं तर शेवटी म्हणायचं ‘हरे राम’ किंवा हरे कृष्णा की संपलं. त्यापुढे जाऊन बोला पुंढली का वरदे म्हणायचं, सगळे लोक म्हणतात याला लईच कळतंय. शेवटी हरीपाठातील एखादा डायलॉग पाठ करायचा. हा धंदा लई सोपा आहे. हरिपाठ खूप सोपा धंदा आहे. मी असले बिझनेस आधी शोधत होतो.”

‘कीर्तनासाठी 5-5 लाख रुपये मिळतात, धंदा सोपा नाही’

“खेड्यापाड्यामध्ये पारायणाचे कार्यक्रम खूप चालतात. आपल्याकडे व्याख्यानं आताआता होत आहेत, तेही अनेकदा होत नाहीत. दुसरीकडं तुम्ही किर्तन पारायण म्हणा, अख्ख गाव उभं. 5-5 लाख रुपये मिळतात, धंदा सोपा नाही. आळंदीत याच्या संस्था आहेत. तिथं महाराज बनतात, मला हे नंतर कळालं. याचीही एक शाखा घ्या असं मी म्हटलं होतं. जनताच तशी झाल्यावर काय करावं. महाराज बनवण्याचे क्लासेस घेण्याची वेळ आलीय. यात फूल पैसा आहे, कारण 80 टक्के जनता आपल्यासारखी बावळट आहे. पैसे मिळवण्यासाठी कीर्तन आणि महाराज होणं हे दोन धंदे खूप चांगले आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

तांदळेच्या वक्तव्यावर नेमका आक्षेप काय?

ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांनी म्हटलं, “शरद तांदळे यांच्या व्हिडीओत वारकरी संप्रदायाविषयी अपशब्द वापरले आहेत. ते उद्योजक, लेखक आहेत. त्याचं द आंत्रप्रेन्यूअर हे पुस्तक वाचून छान वाटले, पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. महाराष्ट्र वारकरी संप्रदाय, संतविचार यांच्यामुळे ओळखला जातो. कीर्तनकार, वारकरी संप्रदाय, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले आहेत. त्याचा मी निषेध करतो. त्यांनी जे शब्द बोलले ते मागे घेऊन माफी मागावी.”

‘शरद तांदळे यांनी वारकरी कीर्तनकारांबद्दल, संप्रदायाबद्दल आक्षेपाहार्य विधाने केली’

वारकरी संप्रदायाचे अनुयायी आणि वारकरी दर्पण या वारकरी संप्रदायाच्या मुखपत्राचे संपादक सचिन पाटील यांनी शरद तांदळे यांच्या या विधानांवर आक्षेप घेतलाय. तसेच या वक्तव्यासाठी त्यांच्या माफीची मागणी केलीय. ते म्हणाले, “माझे मित्र शरद तांदळे यांनी वारकरी कीर्तनकारांबद्दल, संप्रदायाबद्दल काही आक्षेपाहार्य विधाने केले आहे. ह.भ.प. पुरूषोत्तमदादा पाटील यांच्या पोस्टमुळे मला शरद तांदळे यांची ही विधाने समजली. मी शरद तांदळेंना फोन केला व त्यांच्या चुक लक्षात आणुन दिली. त्यांनी दुपारी 1 वाजता चुक मान्य केली आणि दिलगीरी व्यक्त करणारी पोस्ट तातडीने करतो असा शब्द दिला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांनी कोणतीही दिलगीरी व्यक्त केलेली नाही.”

सचिन पवार यांच्या सोशल मीडियावरील या पोस्टवरही अनेक प्रतिक्रिया आल्यात. त्यात काहींनी शरद तांदळे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय, तर काहींनी शरद तांदळेंची भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय. काही युजर्सने शरद तांदळे यांना त्यांची भूमिका मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय.

‘कीर्तन परंपरेचं सर्रास बाजारीकरण होताना ती तळमळ जाणवत नाही’

सोमनाथ कन्नर यांनी या पोस्टवर म्हटलं आहे, “‘निंदकाचे घर असावे शेजारी’, हे आत्मपरीक्षण करण्याचं तत्व वारकरी संप्रदायाला लागू पडत नाही वाटतं? आज तांदळेंच्या बोलण्यामुळे वारकऱ्यांचा तिळपापड होतोय, मात्र आतापर्यंत वारकरी संप्रदायात धर्माच्या नावाने चाललेली कट्टरवादी विचारांची भेसळ होताना आणि कीर्तन परंपरेचं सर्रास बाजारीकरण होताना ती तळमळ जाणवत नाही, हे गमतीशीर आहे. तांदळेंना वारकरी संप्रदायाचं महत्त्व माहीतच नाही, असं तुम्ही छातीठोकपणे म्हणू शकता का? पण त्यांनी जी टीका केली तसं संप्रदायात नाहीच हे मात्र तुम्ही छातीठोकपणे म्हणू शकत नाही.”

“तांदळेंवर टीका करणाऱ्या बऱ्याच ह.भ.प. मंडळींच्या पोस्ट बघतोय. त्या आणि त्याखालील कमेंट बघता कमालीची सहिष्णुता दिसते आहे. कुसुमाग्रजांनी व्यर्थ गेला तुका व्यर्थ गेले ज्ञानेश्वर.. कुणासाठी म्हटलं असावं, याबाबत तीव्र आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही हे थोर आहे,” असं म्हणत त्यांनी शरद तांदळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.

कोण आहेत शरद तांदळे?

शरद तांदळे हे मुळचे बीडमधील वंजारवाडीचे रहिवासी आहेत. त्यांनी वंजारवाडी ते थेट लंडन असा थक्क करणारा प्रवास केलाय. ते स्वतः एक यशस्वी उद्योजक असून त्यांचा यासाठी त्यांना लंडन येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. तेथे त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ‘वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर, 2013’ हा पुरस्कार देण्यात आला. त्यांनी ‘रावण – राजा राक्षसांचा’ या कादंबरीचंही लेखन केलंय. 2018 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यांनी ‘द आंत्रप्रेन्यूअर’ हे पुस्तकही लिहिलं आहे. ते व्याख्याते म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा :

मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय : ह.भ.प. सचिन पवार

“लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं

विठुराया चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला! आख्यायिका काय?

व्हिडीओ पाहा :

Controversy over statement of writter Sharad Tandale on Varkari Community

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI