कोव्हिशिल्ड लस नागपुरात दाखल, विभागातील 6 जिल्ह्यात वितरण, लसीकरण अवघ्या काही तासांवर

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लस घेऊन निघालेली व्हॅन तब्बल 18 तासांचा प्रवास करुन नागपुरात मध्यरात्री पोहोचली.

कोव्हिशिल्ड लस नागपुरात दाखल, विभागातील 6 जिल्ह्यात वितरण, लसीकरण अवघ्या काही तासांवर

नागपूर: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तरित्या बनवलेली कोव्हिशिल्ड लस नागपुरात मध्यरात्री दाखल झाली. मध्यरात्री 2.15 वाजता व्हॅक्सिन घेऊन आलेली व्हॅन उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय इथं पोहोचली. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये या लसीचं वितरण करण्यात आलं आहे. या सहा जिल्ह्यांसाठी लसीचे एकूण 1 लाख 14 हजार डोस पाठवण्यात आले आहेत.(1 lakh 14 thousand doses of Covishield vaccine delivered in Nagpur)

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लस घेऊन निघालेली व्हॅन तब्बल 18 तासांचा प्रवास करुन नागपुरात मध्यरात्री पोहोचली. या दरम्यान व्हॅक्सिन व्हॅनमध्ये तापमान गरजेनुसार नियंत्रित करण्यात आलं होतं. ही लस नागपुरात पोहोचल्यानंतर आता सुरुवातीला नागपूरमधील विभागीय आरोग्य कार्यालयातील कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून यापूर्वीच कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

सीरमसाठी भावनिक, तर देशासाठी ऐतिहासिक क्षण

कोव्हिशिल्ड लसीची पहिली मालवाहतूक देशातील विविध ठिकाणी पाठवण्यात येत आहे. हा सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमसाठी हा एक भावनिक क्षण आहे, अशी पोस्ट सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे या पोस्टसोबत अदर पुनावाला यांनी सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत स्वत: अदर पुनावाला हे कोरोना लस ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्पादन खर्चावर कोरोना लस उपलब्ध करुन दिली असल्याचं सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा उद्देश असल्याचंही अदर पुनावालांनी सांगितले.

लस टोचल्यानंतर 14 दिवसांनी परिणाम

कोरोना लस टोचल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकार क्षमता बनेल याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे. लसीच्या दुसऱ्या डोजनंतर चौदा दिवसांनी शरीरात चांगल्या प्रकारची रोगप्रतिकार क्षमता बनू शकेल. पहिला डोज दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोज दिला जाईल. त्यानंतर 14 दिवसांनी चांगली रोगप्रतिकार क्षमता बनेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर लस घेतल्यानंतरही दक्षता पाळण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.

केंद्र सरकारने किती डोस खरेदी केले?

केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूटकडून दहा लाख डोज खरेदी केल्या आहेत. यापैकी 547200 डोज लसी केंद्र सरकारला मिळाल्या आहेत. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना या लसी पुरवल्या जातील. 14 जानेवारीपर्यंत पहिल्या सत्रातील लसी राज्यांना मिळणार आहेत. दुसरीकडे भारत बायोटेककडून केंद्र सरकारने 55 लाख लसींचे डोज विकत घेतले आहेत. विशेष म्हणजे भारत बायोटेकने 16.5 लाख डोज केंद्र सरकारला मोफत दिले आहेत.

सध्या पर्याय नाही

भारतात सध्या ज्या लसी आहेत त्याच उपलब्ध आहेत. इतर लसींच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे ज्या लसी आहेत त्यांना पर्याय नाही. इतर लसी अंतिम टप्प्यात यशस्वी झाल्या तर पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असं राजेश भूषण यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

तुम्हाला लस किती रुपयात मिळणार? अदर पुनावालांनी 200 रुपयांचं गणित सांगितलं

अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष

1 lakh 14 thousand doses of Covishield vaccine delivered in Nagpur

Published On - 6:40 am, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI