Corona : कोरोनामुळे कापूस निर्यात ठप्प, शेतकऱ्यांचे नुकसान

चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने 80 टक्के आयात-निर्यात थांबवली (Cotton export stop due to corona) आहे.

Corona : कोरोनामुळे कापूस निर्यात ठप्प, शेतकऱ्यांचे नुकसान

जळगाव : चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यामुळे चीन सरकारने 80 टक्के आयात-निर्यात थांबवली (Cotton export stop due to corona) आहे. त्यामुळे भारताकडून येणारी कापसाचीही निर्यात चीनने थांबवल्यामुळे 3 लाख गाठी भारताकडे पडून आहेत. निर्यात थांबल्यामुळे सीसीआयने देखील जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र बंद केले आहेत. शासकीय खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पुन्हा लूट सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनाही नाईलाजास्तव हमीभावापेक्षा तब्बल 500 रुपये कमी दराने कापूस विक्री करावा लागत (Cotton export stop due to corona) आहे.

चीन हा भारताचा प्रमुख कापूस निर्यातदार देश आहे. दरवर्षी भारताकडून 12 ते 15 लाख गाठी चीनला निर्यात होतात. यंदा जानेवारीपर्यंत 6 लाख गाठींची निर्यात चीनमध्ये झाली आहे. मात्र, कोरोना व्हायरसचे वाढत असलेले प्रमाण यामुळे चीनमधून येणारा माल आणि भारतातून जाणारा माल देखील चीन सरकारने थांबवला आहे. त्यामुळे कापसाची पुर्णपणे निर्यात थांबली आहे.

भारताकडे चीनला पाठविण्यात येणाऱ्या 3 लाख गाठी पडून आहेत. भारतासह अमेरिका आणि इतर देशातील निर्यात थांबवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील त्याचा परिणाम होत आहे. आधीच अमेरिका आणि चीनच्या ट्रेडवॉरमुळे चीनमधील निर्यातीवर परिणाम झाला होता.

अचानक केंद्र बंद करण्याचा फतवा

सीसीआयचे केंद्र दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरु राहत असतात. मात्र, 30 जानेवारी रोजी सीसीआयने तातडीने 5 फेब्रुवारीपर्यंत कापूस खरेदी थांबवण्याचे पत्र काढले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत खरेदी सुरु करू नये असेही सीसीआय प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. कापूस खरेदी थांबविण्याबाबतचे कोणतेही कारण सीसीआयने दिलेले नाही.

हमीभावात 100 रुपयांची घट

आंतरराष्ट्रीय बाजारात पसरलेल्या मंदीचा परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला आहे. लाखो गाठी भारताच्या बाजारातच पडून असल्याने आठवडाभरात हमीभावात 100 रुपयांची घट झाली आहे. शासनाने कापसाचा हमीभाव 5550 इतका निश्चित केला होता. मात्र, सध्या 5450 इतक्या भावाने कापसाची खरेदी होत आहे. सीसीआयने जरी खरेदी थांबवली असली तरी मात्र पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरु आहेत.

सीसीआयचे केंद्र बंद होताच व्यापारी-एजंट सक्रीय

आतापर्यंत जिनिंग किंवा शासकीय खरेदी केंद्रावर 15 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. अद्याप 50 टक्के माल शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. त्यातच शासकीय खरेदी थांबल्यामुळे आता ती पुन्हा सुरु होईल की नाही ? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खासगी जिनिंग आणि व्यापाऱ्यांना माल देण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत व्यापाऱ्याकडून 4700 ते 4800 रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल 500 ते 600 रुपयांचे नुकसान होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *