सांगलीतील डिग्रजमध्ये 12 वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढलं

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 21:00 PM, 16 May 2019
सांगलीतील डिग्रजमध्ये 12 वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढलं

सांगली : कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या मुलाला मगरीने पाण्यात ओढल्याची घटना सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज गावात घडली आहे. आकाश मारुती जाधव असं या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. दुपारच्या वेळी आकाशची बहीण नदीच्या काठावर कपडे धूत होती. त्यावेळी आकाश पाण्याच्या जवळ बसला असताना मगरीने अचानक हल्ला केला आणि त्याला पाण्यात ओढलं.

मगर आकाशच्या शरीराला एक तास तोंडामध्ये घेऊन पाण्यात फिरत होती. याची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि वन विभागाकडून मुलाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. पण त्याला शोधण्यात अजूनही यश आलेलं नाही. आकाशचे वडील नदी किनारी असलेल्या विटभट्टीवर काम करतात.

कृष्णा नदीपात्रात मगरींचा प्रजननकाळ सुरु आहे. सकाळीही नर आणि मादी मगरींची प्रणयक्रीडा सुरु असल्याचं दिसून आलं होतं. गुडघाभर पाण्यातही मगरींचा वावर दिसल्याने आसपासच्या लोकांनी तिथून पळ काढला. पण या लहानग्याला त्याची माहिती नसल्याने तो काठावरच बसून होता. दुपारच्या सुमारास नदी काठावर येऊन मगरीने मुलाला ओढून नेलं आणि काही वेळाने सोडलंही. पण हा मुलगा नदीच्या पाण्यात पडल्याने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने मुलाचा शोध घेतला, पण त्याला शोधण्यात अजून यश आलेलं नाही.

दरम्यान, मगरींच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी औदुंबरमधील नदी पात्रातून एका मुलाला मगरीने ओढून नेलं होतं. एका दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्या मुलाचा मृतदेह नदी पात्रात सापडला. डिग्रजमधील घटनेने नदी पात्राशेजारील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.