अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कोकणातील मालमत्तेचा लिलाव, खेडमधील सात शेतकरी खरेदीसाठी उत्सुक

या लिलावातील मालमत्ता खरेदीसाठी मुंबके गावातील सात शेतकऱ्यांनी तयारी दर्शवलीय. तर दुसरीकडे मुंबके येथील दाऊदच्या मालमत्तेची रक्कम निश्चित झाली आहे.

  • मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 13:24 PM, 5 Nov 2020
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कोकणातील मालमत्तेचा लिलाव, खेडमधील सात शेतकरी खरेदीसाठी उत्सुक

रत्नागिरीः कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या लिलावात आता स्थानिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या लिलावातील मालमत्ता खरेदीसाठी मुंबके (Mumbake Village Khed) गावातील सात शेतकऱ्यांनी तयारी दर्शवलीय. तर दुसरीकडे मुंबके येथील दाऊदच्या मालमत्तेची रक्कम निश्चित झाली आहे. (Dawood Ibrahim Konkan Property Auction)

इब्राहिम दाऊदचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके आहे, पण हे गाव सध्या चर्चेत आले आहे. दाऊदचे बालपण या गावात गेले. पण आता मोस्टवाँटेड डॉन म्हणूनही दाऊदचं नाव जगजाहीर करण्यात आलं आहे. लवकरच दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. दाऊदच्या सात जागांचा लिलावांमध्ये समावेश आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या आहेत. यात दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम 14 लाख 45 हजार रुपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत 61 लाख 48 हजार निश्चित करण्यात आलीय. दरम्यान, दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी मुंबके गावातील गावकरीच सरसावले आहेत. 10 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मुंबके गावातील सात शेतकरी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
दाऊदच्या मुंबकेमधील मालमत्तेचा दोन वेळा लिलाव जाहीर झाला होता, परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नाही, आता तिस-यांदा लिलाव होणार आहे.

मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई व वडील दोघेही हयात नाहीत, 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला, दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे, आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित मालमत्ता दाऊदचे काका कसत आहेत. पण आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केलीय. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलाव हा अनेकांसाठी उत्सुकतेचा विषय असतोच. त्यामुळे दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव कोण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी