चंद्रपूरमध्ये डोकं आणि पंजे नसलेला पट्टेदार वाघाचा मृतदेह, वनविभागात खळबळ

वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, दुसरीकडे याच प्राण्यांची शिकारही होत असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे (Dead body of Tiger found in Chandrapur).

चंद्रपूरमध्ये डोकं आणि पंजे नसलेला पट्टेदार वाघाचा मृतदेह, वनविभागात खळबळ

चंद्रपूर : वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, दुसरीकडे याच प्राण्यांची शिकारही होत असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे (Dead body of Tiger found in Chandrapur). चंद्रपूरमधील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात असाच एक संशयास्पद प्रकार समोर आला आहे. भुज वनक्षेत्रातील मुरझा कक्षात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. मात्र, या वाघाचे पंजे आणि डोके बेपत्ता आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या वाघाच्या मृतदेहाजवळच एक मृत गाय आढळल्याने वाघाला विषबाधा झाल्याची दुसरी शक्यताही वर्तवली जात आहे (Dead body of Tiger found in Chandrapur).

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीच्या जंगलात वनकर्मचारी गस्त घालत असताना त्यांना पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाचे पाय आणि डोके बेपत्ता आहे. यानंतर तातडीने या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार वरिष्ठ वनाधिकारी या क्षेत्रात दाखल झाले. या मृत वाघाशेजारी काही अंतरावर एक मृत गाईचे अवशेषही आढळले. त्यावरुन विषप्रयोग करुन वाघाला संपवल्याचीही शक्यता आहे.

दरम्यान वाघाचे पाय आणि डोके बेपत्ता असल्याने शिकारी टोळीचा संशय निर्माण झाला आहे. या भागातील दोन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यांची प्राथमिक चौकशी केली जात आहे. वनाधिकारी आणि वन्यजीव संस्था प्रतिनिधींच्या देखरेखीत या वाघावर घटनास्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या गंभीर घटनेच्या तपासासाठी वनविभागाने दोन पथकांची स्थापन केली आहे.

या घटनेनंतर आसपासच्या गावातील नागरिकांची विचारपूस केली जात आहे. ही घटना सुमारे चार दिवस आधीची असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. ब्रह्मपुरीचे जंगल संपन्न असले तरी गावांची घनता या जंगलात अधिक आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाला या भागात वेगळी किनार आहे. सध्या शेत शिवारातील भाजी पिकांचा हंगाम जोरात असताना ही घटना उघडकीस आल्याने वनविभाग अधिक सतर्क झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *