होर्डिंग बळीचे सत्र सुरुच, करपट्ट्यांवर डोळा ठेऊन प्रशासनाचे दुर्लक्ष?

राज्यात पावसाच्या आगमनासह होर्डिंग कोसळण्याचे सत्रही सुरु झाले आहे. पुण्या पाठोपाठ आज ठाणे एसटी डेपोतही होर्डिंग पडल्याने खळबळ उडाली.

Hoarding Collapse, होर्डिंग बळीचे सत्र सुरुच, करपट्ट्यांवर डोळा ठेऊन प्रशासनाचे दुर्लक्ष?

ठाणे : राज्यात पावसाच्या आगमनासह होर्डिंग कोसळण्याचे सत्रही सुरु झाले आहे. पुण्या पाठोपाठ आज ठाणे एसटी डेपोतही होर्डिंग पडल्याने खळबळ उडाली. बुधवारी चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात देखील अशाच एका दुर्घटनेत एका नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला होता. मात्र, याबाबात प्रशासन गाफील असल्याचे पहायला मिळत आहे.

ठाणे पश्चिमेकडील एसटी डेपोच्या परिसरात नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी जोरदार वारे सुरु झाले आणि अचानक एसटी डेपोतील होर्डिंग कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने परिसरात होर्डिंगची चांगलीच दहशत पसरली आहे. सदर होर्डिंगचा संपूर्ण ढाचा गंजलेला होता. त्यामुळे जोरदार वाऱ्यात हे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग एसटी महामंडळाच्या अधीन असून या दुर्घटनेला तेच जबाबदार असल्याचे मतं प्रवाशांनी व्यक्त केले.

दुसरीकडे स्थानक प्रशासन मात्र आपली जबाबदारी झटकत आहे. हे होर्डिंग लावण्याच्या परवानग्या देण्याचे काम वेगळ्या विभागाचे असल्याने आपण जास्त माहिती देऊ शकत नाही, असे मत स्थानक प्रमुख शामराव  भोईर यांनी व्यक्त केले.

पुण्यातही होर्डिंग पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेरील घटनाही ताजी असून त्यातही एका जेष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. मागील पावसाळ्यात देखील अशाच अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. परंतु भाड्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या करपट्ट्यांवर डोळा ठेऊन प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.

दरम्यान, मागील वर्षी पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळले होते. त्याखाली 7 जण सापडले होते. यापैकी 4 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर इतर नागरिक गंभीर जखमी झाले होते. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *