स्ट्राँग रुमचं रक्षण करणाऱ्या रँचोची मनाला चटका लावणारी 'एक्झिट'

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची लगबग सुरु झाली आहे. काही तासांवर निकाल येऊन ठेपला आहे. निकालासाठी EVM अत्यंत महत्त्वाची आहेत. याच EVM ची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलातील ‘रँचो’ने आज कायमचा निरोप घेतला. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणाऱ्या रँचोची निकालाआधीच झालेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. रँचो कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकातील श्वान. …

स्ट्राँग रुमचं रक्षण करणाऱ्या रँचोची मनाला चटका लावणारी 'एक्झिट'

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची लगबग सुरु झाली आहे. काही तासांवर निकाल येऊन ठेपला आहे. निकालासाठी EVM अत्यंत महत्त्वाची आहेत. याच EVM ची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलातील ‘रँचो’ने आज कायमचा निरोप घेतला. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणाऱ्या रँचोची निकालाआधीच झालेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली.

रँचो कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकातील श्वान. मागील 7 वर्षांपासून रँचोने पोलीस दलामध्ये काम केले. विशेष म्हणजे त्याने लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. ज्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानयंत्र ठेवली आहेत. त्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची जबाबदारी रँचोकडे होती. रँचोने ही जबाबदारी मतदानापूर्वी आणि मतदानानंतरही चोख पार पाडली.

निवडणूक काळातील या कामाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे कामही या रँचोकडे आहे. अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, कोल्हापूर विमानतळ आणि अनेक मान्यवर व्यक्तींचे दौरे रँचोच्या देखरेखीनंतरच पार पडायचे. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून रँचो आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते, मात्र आज त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकावर शोककळा पसरली.

पोलिसांनी रँचोला बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. 2 दिवसांनी रँचोचा जन्मदिनही होता. मात्र, त्याआधीच तो गेल्याने अधिकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *