आपल्याकडे लोकांना सध्या वेगळाच नाद लागलाय : धनंजय मुंडे

"माझा परळी मतदारसंघातील सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार आहे", असं धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) म्हणाले.

आपल्याकडे लोकांना सध्या वेगळाच नाद लागलाय : धनंजय मुंडे

बीड : आपल्या लोकांना जरा वेगळाच नाद लागलाय. तो नाद जरा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे वळवा, असा उपरोधात्मक सल्ला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिला आहे. परळीतल्या विभागीय पशु प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

“पशुधन सांभाळण्यासाठी नाद लागतो. मात्र, आपल्याकडे लोकांना पशुधनाचा कमी आणि नको त्या कामांचा जास्त नाद आहे. माझी अपेक्षा आहे की, पुढच्या वर्षीच्या पशु प्रदर्शनामध्ये आपल्या तालुक्यातील एखाद्या चांगल्या बैलजोडीला, गायीला, म्हशीला, शेळीला कुठलंतरी एक पारितोषिक मिळेल. याची जबाबदारी तुम्ही घ्याल तरच खऱ्या अर्थाने आम्ही आयोजित केलेले एवढे मोठे कार्यक्रम सार्थकी ठरतील”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

“आपण फक्त खिश्यात हात घालून पशु प्रदर्शनात लोकांचे पशुधन बघत फिरतो. मात्र आपलं एकही पशुधन यात सहभागी नसतं. कारण आपल्याला जरा वेगळा नाद लागला आहे. पशुधन सांभाळणं हा एक नाद आहे आणि तो परळीतील नागरिकांनी जोपासायला हवा. तरच आपल्या भागातील पशुधनालाही प्रदर्शनात पारितोषिके मिळतील”, असा सल्ला धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी पशु प्रदर्शनाला उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

“आपण प्रदर्शन ठेवतो आणि पारितोषिके बाहेरुन आलेले लोक घेऊन जातात. घेऊन जाऊद्या. ही आनंदाची गोष्ट आहे. आम्हालासुद्धा याचा अभिमान आहे. आपली यात्रादेखील त्यातोडीची आहे म्हणून ते सर्व पशुधन येथे आणतात. प्रदर्शन उभं करतात आणि त्या स्पर्धेत उतरुन बक्षिस घेऊन जातात. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की, आपल्याला पशु संवर्धनाची ही मोहिम अतिशय भव्य पातळीवर घेऊन जायची आहे”, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

“माझा परळी मतदारसंघातील सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार आहे. या कामात दुग्ध व्यवसायाचा सिंहाचा वाटा असणार आहे”, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *