अहमदनगर : शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे (SaiBaba Sansthan) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आता हा वाद थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचलाय. काही ग्रामस्थांनी नियम डावलून मंदिर परिसरात प्रवेश केल्याने त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा, असं पत्र साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलिसांना देण्यात आलंय. (Dispute Between Shirdi Villagers And Sai Sansthan in Shirdi)
नवीन वर्षाच्या प्रारंभी साईदर्शनावरून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, माजी विश्वस्त सचिन तांबे आदींसह ग्रामस्थ आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. बगाटे यांनी ग्रामस्थांचा रोष पाहता जमिनीवर लोटांगण घेऊन दिलगिरी व्यक्त केली, मात्र अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ग्रामस्थ दुरूनच साईदर्शन घेत बाहेर पडले. ग्रामस्थ सबुरीने घेत असताना साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पोलिसांना पत्र देत ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. पत्रासोबत सीसीटीव्ही आणि कॅमेरा फुटेज देखील पोलिसांना दिले आहे. या प्रकरणात अधिक चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे यांनी सांगितलंय.
शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील हा वाद पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचला, परंतु सध्या ग्रामस्थ सबुरीने घेत आहेत. शिर्डी मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना ग्रामस्थांनी सदर वादाची माहिती दिली, मात्र सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत विखे-पाटील व्यस्त असल्याने ग्रामस्थांसोबत होणारी बैठक विखे पाटील दोन दिवसांनी घेणार असल्याचं कळतंय. ग्रामस्थ सध्या तरी या प्रकरणी आता मौन बाळगून आहेत.
31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजे साधारण साडे अकरा वाजता काही ग्रामस्थ, मानकरी आणि पदाधिकारी शनिगेट जवळील प्रशासकीय द्वाराजवळ जाऊन थांबले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी धावत येऊन तुम्ही येथे कसे आलात. चला मागे चला असं म्हणत काही पदाधिका-यांना खेचण्यास सुरुवात केली. एवढंच नव्हे तर कॅमेरा चित्रीकरण सुरू ठेवले आणि सर्व ग्रामस्थांना त्याठिकाणाहून बाहेर काढले. त्यानंतर मोठा लवाजामा घेऊन बगाटे पुन्हा शनिगेटकडे गेल्यानं शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचा निषेध केलाय.
नवीन वर्षाच्या प्रारंभाला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांना मिळालेली वागणूक नक्कीच निषेधार्ह असल्याचा सूर आता शिर्डीत उमटू लागलाय. ड्रेसकोडचा वाद, काकड आरतीसाठी पैशाची मागणी, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध आणि आता साई दर्शनाहून ग्रामस्थ आणि कार्यकारी अधिका-यांमध्ये सुरू झालेल्या वादाने साईंची शिर्डी नगरी आता वादाची नगरी ठरतेय की काय, असा प्रश्न निर्माण झालाय.
संबंधित बातम्या
बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा
Dispute Between Shirdi Villagers And Sai Sansthan in Shirdi