बर्ड फ्लूसंदर्भात अफवा आणि चुकीची माहिती पसरवू नये: मुख्यमंत्री

या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:22 PM, 11 Jan 2021
uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : बर्ड फ्लूसंदर्भात अफवा आणि चुकीची माहिती पसरवू नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. बर्ड फ्लूसंदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेतला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. (Don’t Spread Rumors And Misinformation About Bird Flu Says Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्लूसंदर्भात आढावा घेऊन नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी यासंदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरिता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3 ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध  करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्ड फ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी आणि मांस 70 डीग्रीपेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज आणि अफवा पसरविण्यात येऊ नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, परभणीत 843 कोंबड्या, ठाण्यात बगळे आणि इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे बर्ड फ्लू अहवाल एच 5 एन 1 व बीड येथील 11 कावळ्यांचा अहवाल एच 5 एन 8 असा आला आहे. उर्वरित ठिकाणचे अहवाल भोपाळहून प्राप्त व्हायचे आहेत. पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. केंद्र शासनाच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्याप्रमाणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे या सूचनांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 7 जानेवारीपासून कंट्रोल रूम स्थापित केले असून, मृत पक्ष्यांची माहिती घेणे सुरू आहे. पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात यावेत, अशाही सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Bird Flu | दिल्लीनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लू, 9 राज्यांत संसर्ग

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, 3 पाणबगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह, प्रशासन सतर्क

Don’t Spread Rumors And Misinformation About Bird Flu Says Uddhav Thackeray