आईसोबत संबंध असल्याचा राग, अल्पवयीन मुलाकडून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या

  • चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा
  • Published On - 19:06 PM, 4 May 2019
आईसोबत संबंध असल्याचा राग, अल्पवयीन मुलाकडून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या

वर्धा : अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आलाय. सकाळच्या  सुमारास मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असून अवघ्या काही तासात आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपींनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास हत्या करत दिवसभर मृतदेह घरी ठेवत रात्री विल्हेवाट लावली.

मृत युवक हा हमालीचं काम करत होता. युवकाला दारूचं व्यसन असल्याचं बोललं जातंय. यातच त्याचं गावातील एका महिलेसोबत सुत जुळलं. या महिलेच्या घरी हा नेहमी येत-जात असायचा. ही महिला सुद्धा दारूच्या आहारी गेली असल्याचं बोललं जातंय. यातच यांचे शाब्दिक वाद व्हायचे. या अनैतिक संबंधाची माहिती महिलेच्या पतीसह मुलाला लागली. महिलेच्या पतीने युवकाला पत्नीपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. मात्र युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

नेहमीप्रमाणे शुक्रवारी मृत तरुण महिलेच्या घरी दारू पिण्याकरिता आला. यावेळी संबंधित महिला, तिचा पती आणि मृत तरुण हे तिघे दारु पित होते. पण याचवेळी महिलेच्या 17 वर्षीय मुलाने संबंधित तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या कृत्यासाठी 17 वर्षीय मुलाला आई-वडिलांनीही साथ दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

मारहाणीनंतर पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर दिवसभर मृतदेह घरातच ठेवण्यात आला. संध्याकाळी हा मृतदेह घरामागील शेतात आणून फेकण्यात आला. शनिवारी सकाळी गावातील एका महिलेला मृतदेह नजरेस पडला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. तळेगाव पोलिसांनी काही तासातच या हत्येचा छडा लावत तीन जणांना अटक केली.