डॉ. द्वारकादास लोहियांचं निधन, आज अंत्यसंस्कार

  • Sachin Patil
  • Published On - 11:16 AM, 24 Nov 2018

महेंद्र मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड: ज्येष्ठ समाजसेवक आणि मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया यांचं 81 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी शुक्रवारी रात्री 10.45 वा. राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता मानवलोक मुख्य कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. द्वारकादास लोहिया यांचा संघर्ष आणि त्यांचं कार्य उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं आहे.

डॉ. द्वारकादास लोहिया यांनी राष्ट्रसेवादल, सानेगुरुजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी यासारख्या संघटनांच्या माध्यमातून काम केलं. सामान्य, शोषित, पीडित, वंचितांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांना नवी दिशा देण्याचं काम डॉ. लोहियांनी केलं.

मानवलोक संस्थेचं कार्य पाहून जगाने अंबाजोगाईची दखल घेतली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कामं केली. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित आणि परित्यक्त्यां महिलांना आधार दिला. तसंच गरिब आणि निराधारांचा ते आधारवड बनले.

द्वारकादास लोहियांच्या पश्चात प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मुलगी प्रा. अरुंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे.

डॉ. द्वारकादास लोहिया यांचं अंबाजोगाईजवळचं पाटोदा हे गाव. त्यांनी नांदेडच्या आयुवेर्दिक महाविद्यालयात डॉक्टरकीचे धडे गिरवले. त्यादरम्यान ते डॉ. बापूसाहेब काळदाते आणि पन्नालाल सुराणा यांच्या संपर्कात आले आणि सेवादलाच्या चळवळीत गेले. 1962 मध्ये दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी सेवादलाच्या कलापथकातील धुळ्याच्या शैला परांजपे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला.  लग्नानंतरही ते अंबाजोगाईतच राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

1982 मध्ये त्यांनी ‘मराठवाडा नवनिर्माण लोकायतन’ म्हणजे ‘मानवलोक’ची नोंदणी केली. पण ‘मानव लोक’चे काम तसे 1972 च्या दुष्काळापासून सुरु होते. पुढे वंचित, गरिबांसाठी त्यांनी अविरत काम केलं. त्यांच्या निधनाने दिन दुबळ्यांचा आधारवड हरपल्याची भावना आहे. टीव्ही 9 मराठीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!