मंत्रिपदाचं आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम राहील : एकनाथ खडसे

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी पक्षातील नाराज नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांची नाराजी दूर झाली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:16 PM, 4 Jan 2020
मंत्रिपदाचं आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम राहील : एकनाथ खडसे

जळगाव : “नाथाभाऊला आमदारकीचं किंवा मंत्रिपदाचं आमिष दाखवलं तर नाथाभाऊ हा विषय सोडून देतील, असं काही लोकांना वाटत आहे. मी आमदारकी वगैरेच्या आमिषाला (Eknath Khadse reaction after Devendra Fadnavis meet) बळी पडणार नाही. माझी नाराजी कायम आहे”, असं स्पष्टीकरण भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse reaction after Devendra Fadnavis meet) यांनी दिलं आहे. शुक्रवारी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंची भेट घेतली होती.

“मी अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये काम केलं आहे. विरोधी पक्षामध्ये असताना कधी सत्तेची, मंत्रिपदाची किंवा कोणत्याही पदाची मी आशा केली नाही. अशा कालखंडात काम करणाऱ्या माणसाला एखाद्या आमदारकीचं आमिष दाखवून विषय सोडला जाऊ शकत नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माझा संघर्ष आहे. मला तिकीट नेमकं का नाकारलं गेलं? याची कारणं मला हवी आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

याशिवाय “माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार केली आहे. जनतेत असा गैरसमज होऊ नये की, काल मी फडणवीस आणि महाजन यांना हसतखेळत भेटलो त्यामुळे माझी नाराजी दूर झाली. राजकारणामध्ये मी तुला भेटणार नाही किंवा तुझ्याशी बोलणार नाही अशाप्रकारच्या काही गोष्टी नसतात. राजकारणामध्ये खेळीमेळीचं वातावरण असू शकतं. परंतु, आपलं ध्येय आणि तत्व सोडायचे नसतात. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमची भेट झाली”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

“मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. परंतु, ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत होती. या भेटीत निवडणूक वगळता दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. मी जे वक्तव्य केलं होतं की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी पक्षश्रेष्ठींकडे माझ्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्या वक्तव्यावर अजूनही मी कायम आहे”, असं स्पष्टीकरण खडसेंनी दिलं.