सरपंच आणि सदस्यपदांचा लिलाव झालेल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर, 12 मार्चला मतदान, वाचा नेमकं प्रकरण काय?

ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सरपंच आणि सदस्यपदांचा लिलाव करण्यात आलेल्या गावांमध्ये निवडणूक रद्द करण्यात आलेली. निवडणूक आयोगाने आता या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे (Election commission declare four villages Grampanchayat Election program)

सरपंच आणि सदस्यपदांचा लिलाव झालेल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर, 12 मार्चला मतदान, वाचा नेमकं प्रकरण काय?

मुंबई : निवडणूक आयागाने सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांच्या लिलावाप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे, कातरणी आणि नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द केला होता. निवडणूक आयोगाने आता या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 12 मार्चला या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहे. नाशिक आणि नंदूरबारसह अहमदनगर जिल्ह्यातील वाकी ग्रामपंचायतीचीदेखील निवडणूक 12 मार्चला पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत घोषणा केली आहे (Election commission declare four villages Grampanchayat Election program).

“उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सदस्य आणि सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.2 मधील निवडणूक नि:पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती. आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी 24 फेब्रुवारी 2021 रोजी होईल”, असं यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं.

“नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2021 असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 12 मार्च 2021 रोजी होईल आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी होईल”, असं देखील त्यांनी सांगितलं (Election commission declare four villages Grampanchayat Election program).

लिलावाची रक्कम ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी वापरण्याचा निर्णय

नाशिकच्या उमराणे गावात (UMARANE VILLAGE) सरपंचपदाचा लिलाव करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा लिलाव थोड्या थोडक्या नव्हे तर 2 कोटी 5 लाख रुपयांत करण्यात आला. लिलावात जमा झालेली रक्कम गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी वापरली जाणार असल्याने उमराणे ग्रामस्थांच्या या अनोख्या लिलावाची जोरदार चर्चा होती.

गावातील प्राचीन रामेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम गेल्या 7 वर्षांपासून बंद असून, मंदिराची वार्षिक सभा बोलवण्यात आली होती. त्या सभेत सर्व पक्षाचे नेते, गावातील ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते. त्या सभेत असे ठरवण्यात आले की मंदिराच्या उरलेल्या कामासाठी सुमारे 2 कोटी रुपये लागणार असून, ते पैसे गावातून जमा करायचे आहेत. त्यासाठी कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी, या बदल्यात निवडणुकीसाठी उभे ठाकणारे जे सदस्य आर्थिक मदत करतील, त्यांनाच मतदान केलं जाईल. याशिवाय सर्वाधिक निधी देणा-या उमेदवाराला सरपंचपदाचा मान देखील मिळणार, असा निर्णय घेण्यात आला होता.

ग्रामपंचायत निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना मतदानाच्या दिवशी कुठे दारू, कुठे पार्टी, कुठे पैसे वाटले जातील. हा खर्च टाळून गावात किमान ग्रामदैवतेचं मंदिर उभं राहील यादृष्टीने ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयावर अनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.

संबंधित बातम्या :

ऐकावं ते नवलंच! नाशकातल्या एका गावात चक्क कोट्यवधी रुपयांत सरपंचपदाचा लिलाव

‘टिव्ही 9 मराठी’च्या बातमीचा दणका, कोट्यवधीत सरपंचपदाचा लिलाव, निवडणूक आयोगाकडून 2 ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द

Published On - 7:55 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI