काका राणेंच्या सेना प्रवेशानंतरही जानवली ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे; नितेश राणेंचा पलटवार 

शिवसेनेत प्रवेश घेऊन कणकवलीचे आमदार नितेश राणेंना त्यांच्याच होमपीचवर जोरदार धक्का दिला होता. मात्र या प्रवेशाला 24 तास होत नाहीत तोच आमदार नितेश राणेंनी वैभव नाईक यांच्यावर पलटवार केला. Nitesh Rane vaibhav naik

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग 
  • Published On - 21:33 PM, 21 Apr 2021
काका राणेंच्या सेना प्रवेशानंतरही जानवली ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे; नितेश राणेंचा पलटवार 
nitesh rane

कणकवलीः जानवली गावचे प्रभारी सरपंच काका राणे आणि अमोल राणे यांचा कार्यकर्त्यासह काल शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सेना प्रवेश झालाय. सरपंच निवडीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत प्रवेश घेऊन कणकवलीचे आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) त्यांच्याच होमपीचवर जोरदार धक्का दिला होता. मात्र या प्रवेशाला 24 तास होत नाहीत तोच आमदार नितेश राणेंनी वैभव नाईक यांच्यावर पलटवार केला. (Even after the entry of Kaka Rane shivsena, the power of kankavali in Janawali Gram Panchayat remained with BJP; Nitesh Rane counterattack)

जानवलीतील राजकीय हालचाली गतिमान

सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येलाच जानवलीतील राजकीय हालचाली गतिमान झाल्याने या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र भाजपच्या शुभदा राजेश रावराणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर पुन्हा एकदा आमदार नितेश राणे हेच कणकवलीत किंगमेकर ठरल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून एकही अर्ज दाखल नाही

सरपंचपदाच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेने प्रभारी सरपंच भाजपचे काका राणे यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता, मात्र प्रत्यक्षात सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन भाजपच्या शुभदा रावराणे या सरपंचपदी विराजमान झाल्यात. जानवली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या सरपंच निवडीसाठीच्या विशेष बैठकीत शुभदा रावराणे या बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. पालकर यांनी केली.

जानवली ही कणकवलीतील मोठी ग्रामपंचायत

त्यानंतर भाजपने पेढे वाटून यावेळी आनंद साजरा केला. जानवली ही कणकवलीतील मोठी ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे असतानाच काही महिन्यांपूर्वी सरपंच आर्या राणे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त झालं होतं. प्रभारी सरपंच म्हणून काका राणे यांची निवड झाली होती. मात्र निवडणुकीच्या आदल्या दिवशी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांच्या उपस्थितीत प्रभारी सरपंच काका राणे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने याठिकाणी उत्सुकता ताणली गेली होती. अखेर भाजपने शुभदा रावराणे यांना बिनविरोध निवडून आणून शिवसेनेला धोबीपछाड दिला. काका राणे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सरपंच निवडीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जानवली ग्रामपंचायतीच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

वैभव नाईकांच्या मतदारसंघात शिवसेनेला सुरुंग, नितेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळच्या सभापती भाजपात

कुडाळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणेंच्या बंगल्यावर शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश

Nitesh Rane counterattack on vaibhav naik via Janawali Gram Panchayat election