पुणतांब्यातील कृषीकन्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, एकीची प्रकृती खालावली

पुणतांब्यातील कृषीकन्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस, एकीची प्रकृती खालावली

शिर्डी : सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील कृषीकन्या उपोषणाला बसल्या आहेत. या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून कुठल्याही नेत्याने याची दखल घेतलेली नाही. चार दिवसांपासून तीन कृषीकन्या अन्यत्याग आंदोलन करत आहेत. त्यापैकी शुभांगी जाधव या तरुणीची तब्येत आता खालावली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदारांनी शुभांगीला समजवून रुग्णालात नेण्याचे प्रयत्न केले, मात्र आश्वासनं पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय शुभांगीने केला.

किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनाला पाठिंबा देत पुणतांबा येथील कृषीकन्या अन्नत्याग आंदोलन करत आहेत. निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या तीन जणी गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणावर बसल्या आहेत. सातबारा कोरा करा, शेत मालाला दीड पट हमीभाव द्या, दुधाला प्रतिलिटर 50 रुपये भाव द्या अशा प्रमुख मागण्यांसह या मुली चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. अन्नत्याग केल्याने तिन्ही मुलींचं वजन कमी झालं आहे. यापैकी शुभांगी जाधव हिची प्रकृतीही खालावली आहे.

वैद्यकीय पथकाने आंदोलनकर्त्यांची तपासणी केल्यानंतर याचा अहवाल तहसीलदारांना पाठवण्यात आला. त्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शुभांगीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, शुभांगीने नकार दिला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या मुलींनी केला.

आंदोलनासाठी विविध संघटनांनी या मुलींची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. मात्र या आंदोलनाकडे पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते तसेच लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या चार दिवसांपासून पुणतांबा ग्रामस्थांनी विविध आंदोलनं केली. गुरुवारी भिक मांगो आंदोलन करत ग्रामस्थांनी भिक मागून मिळणारा निधी मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं सांगितल आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *